
सलगर वस्ती व फ्री सेटलमेंट कॉलनीत पाहणी; थकबाकीदारांना नोटीस, मिळकत कर भरण्याचे आवाहन
सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सलगर वस्ती आणि फ्री सेटलमेंट कॉलनी भागात थेट भेट देऊन मिळकत कर थकबाकीदारांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. मिळकत कर न भरणाऱ्या नागरिक आणि व्यावसायिकांवर कठोर भूमिका घेत त्यांनी तात्काळ नोटीस बजावण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.
पाहणी दरम्यान आयुक्तांनी अनेक नागरिक, व्यावसायिक, दुकानदार, शाळा, मेडिकल्स यांच्याशी थेट संवाद साधून कर भरण्याचे आवाहन केले. अधिकृत मंजुरीशिवाय झालेल्या वाढीव बांधकामांवर मिळकत कर आकारणी करण्याचे आणि आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
कर भरण्यास वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनांना अंतिम नोटीस देऊन ठराविक कालावधीत कर न भरल्यास सील करण्याची प्रक्रिया राबवावी, असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.
महसूल वाढवण्यासाठी आणि नागरी सुविधांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून मिळकत कर वसुली मोहिमेला गती देण्यात आली आहे. नागरिकांनी स्वतःहून कर भरून जबाबदार नागरिकत्व निभावावे, असे आवाहन डॉ. ओम्बासे यांनी केले.
यावेळी उपायुक्त आशिष लोकरें यांच्यासह मालमत्ता विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.