
धाराशिव – माजी खासदार कै. ॲड. भाई नरसिंगराव देशमुख काटीकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा न्यायालय, धाराशिव येथे न्यायिक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी व विधिज्ञ बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मराठवाड्यातील पहिले पदवीधर विधीज्ञ असलेले कै. नरसिंगरावजी हे स्वातंत्र्यपूर्व काळात समाजप्रबोधन आणि शिक्षण प्रसारासाठी झटणारे युगपुरुष होते. त्यांनी मराठा व तत्सम बहुजन समाज शिक्षण परिषद स्थापून शिक्षणाची दारे खुली केली. सावकारशाही व निजामशाहीविरोधात त्यांनी सशस्त्र उठावात नेतृत्व केले आणि हैदराबाद मुक्ती संग्रामात योगदान दिले. निजाम शासनात उर्दूची सक्ती असताना मराठी भाषेचा वापर केल्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला गेला; मात्र त्यांनी कायदेशीर लढाईतून आपली निर्दोष मुक्तता साधली.
या स्मरणार्थ आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. सी. खटी, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील, व धाराशिव विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. अमोल वरुडकर यांच्या हस्ते कै. दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
शिबिरामध्ये डॉ. धनंजय पडवळ, डॉ. अश्विनी मुंडे पडवळ, डॉ. अजित डिकले, डॉ. प्रियांका मुंडे–डिकले, डॉ. महेश पाटील, डॉ. कृष्णा स्वामी, डॉ. अविनाश तांबारे, डॉ. धवलकुमार बनसोडे यांसारख्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली.
या कार्यक्रमावेळी जिल्हा न्यायाधीश मिटकरी मॅडम, आवटे, ठूबे, खोमणे, जिल्हा सेवा प्राधिकरणाच्या सचिव पाटील मॅडम, ॲड. अविनाशराव देशमुख, ॲड. पंडितराव नळेगावकर, ॲड. लोमटे महाराज व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीताठी डॉ. धनंजय पडवळ व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.