
ऑगस्ट अखेरीस १०८ फूट शिल्पासाठी देशातील शिल्पकार सादर करणार नमुने
तुळजाभवानी मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
तुळजापूर – तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देत असतानाचे १०८ फूट उंचीचे भव्य शिल्प तुळजापुरात आता लवकरच साकारले जाणार आहे. अष्टभुजा ‘शिवभवानी’चा अंगावर शहारे आणणारा प्रेरणादायी विचार त्यानिमित्ताने सर्व भाविकांना अनुभवता येणार आहे. त्यासाठी राज्याच्या कला संचालनालयाकडे देशभरातील शिल्पकारांकडून शिल्प नमुने मागविण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. ऑगस्ट अखेरीस अडीच ते तीन फूट आकाराचे फायबरचे शिल्प नमुने कला संचालनालयाकडे प्राप्त होणार आहेत. त्यातून पहिल्या पाच शिल्पांची निवड करून त्या पाच शिल्पापैकी एक शिल्प अंतिम केले जाणार आहे. हे शिल्प शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या प्रेरणेची जाज्वल्य गाथा असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
मुंबईच्या निर्मल भवन येथील मित्र संस्थेच्या कार्यालयामध्ये तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अनुषंगाने एक उच्चस्तरीय बैठक झाली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री. किर्ती किरण पूजार हे देखील उपस्थित होते. या बैठकीत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. १०८ फूट उंच शिल्प उभारण्याच्या प्रस्तावावर सखोल चर्चा झाली. सुप्रसिद्ध इतिहासकार आणि शिवव्याख्याते पांडुरंग बलकवडे यांनी या प्रसंगाचे ऐतिहासिक संदर्भ, शिलालेख, ग्रंथ व लोक परंपरेवर आधारित माहिती सादर केली. राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी आई तुळजाभवानी देवीच्या मूर्तीचे स्वरूप सादर केले.
या नियोजित भव्य शिल्पामुळे भाविकांना केवळ धार्मिक अनुभूतीच नव्हे तर राष्ट्रनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींचे प्रेरणास्थान असलेल्या आई तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेत असलेला अद्वितीय आणि अनुपम देखावा अनुभवता येणार आहे. हे शिल्प श्रद्धा आणि प्रेरणेचे रोमांचक प्रतीक असणार आहे.
या प्रेरणादायी आणि भव्य शिल्पाभोवती आकर्षक परिसर विकास, प्रकाश योजना, संग्रहालय व माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या सौंदर्यात आणखी वाढ होणार आहे. या शिल्पासाठी कला संचालनालय आणि पुरातत्व विभाग यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशभरातील नामवंत शिल्पकारांना शिल्पाचे नमुने सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. ऑगस्ट अखेरीस अडीच ते तीन फूट आकाराचे फायबरचे शिल्प नमुने सादर करण्यात येणार आहेत. त्यातून उत्कृष्ट पाच शिल्प नमुन्याची निवड होणार आहे. या पाच सर्वोत्तम शिल्पापैकी सर्वोत्कृष्ट शिल्प निवडल्यानंतर प्रत्यक्ष शिल्प उभारणीस प्रारंभ केला जाईल.
या उपक्रमामुळे तुळजापूरचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव नव्याने खुलणार आहे. मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांनी आई तुळजाभवानी मातेच्या सेवेसाठी आपल्याला मोठे पाठबळ दिले आहे. शिवभक्तांना आणि भवानीमातेच्या भक्तांना त्यांच्या श्रद्धेचे प्रतीक आणि प्रेरणादायी भाग असलेला क्षण यामुळे अनुभवता येणार आहे.
शिल्पकारांना मिळणार १७.५ लाख रुपये मानधन
फायबर मॉडेल तयार करण्यासाठी इच्छुक शिल्पकारांकडे शिल्प कलेतील पदवी अथवा पदविका असणे आवश्यक आहे. याशिवाय किमान १५ वर्षांचा व्यावसायिक अनुभव असणेही अपेक्षित आहे. तयार करण्यात आलेल्या फायबर मॉडेल्स मधून एकूण पाच मॉडेल्सची निवड समितीद्वारे करण्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक शिल्पकाराला दीड लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे. तसेच अंतिम निवड झालेल्या सादरकर्त्याला १० लाख रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. देशभरातील कला उपासक शिल्पकारांनी या ऐतिहासिक संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.