
धाराशिव (प्रतिनिधी -: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी धाराशिव मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली असून येत्या १५ ऑगस्ट रोजी तेरणा धरणात जलसमाधी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात मनसेच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले असून यावेळी धाराशिव तालुका अध्यक्ष सलीमभाई औटी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकटात सापडले असून शेतीवरील कर्जाचा बोजा दिवसेदिवस वाढत आहे. शासनाकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शासनाने तत्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना १५ ऑगस्ट रोजी तेरणा धरणात जलसमाधी आंदोलन करणार असून याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.
मनसे ने दिलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार (जिल्हा प्रशासन) काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.