
धाराशिव (प्रतिनिधी) – वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींवर पवनचक्की प्रकल्प उभारणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांना तुटपुंजा मोबदला देण्यात आला असून, कोऱ्या कागदांवर त्यांच्या सह्या घेण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या संपूर्ण प्रकाराचा विरोध करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.
उपोषणाला पाच दिवस उलटून गेले तरी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. परिणामी, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावू लागली. या आंदोलनाची दखल घेत आमदार कैलास पाटील स्वतः आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेतली व त्यांच्या संघर्षाला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.
आंदोलनादरम्यान आमदार पाटील यांनी स्पष्ट शब्दांत प्रशासनाला जाब विचारला. “शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या कंपन्यांची ही मनमानी आम्ही खपवून घेणार नाही,” असे ते म्हणाले. पोलिस यंत्रणा, बाऊन्सर आणि स्थानिक गुंड यांच्या मदतीने शेतकऱ्यांवर दबाव टाकण्याचे प्रकारही या आंदोलनात उघड झाले.
संध्याकाळपर्यंत सुरू असलेल्या या आंदोलनात आमदार पाटील स्वतः शेतकऱ्यांसोबत थांबले. शेवटी, आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करत जिल्हा प्रशासनाने लेखी आश्वासन दिले की, संबंधित पवनचक्की कंपन्यांवर कारवाई केली जाईल आणि शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला दिला जाईल. त्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
“जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला प्रत्यक्षात मिळत नाही, तोपर्यंत मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार,” असा निर्धार आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला.