
आई तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनातील तलवार गायब? मंदिर समितीचा खुलासा – ‘तलवार सुरक्षित आहे’
धाराशिव – तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनासाठी वापरण्यात येणारी तलवार गायब झाल्याचा आरोप भोपे पुजारी मंडळाने केल्यानंतर आज मंदिर समितीने अधिकृत खुलासा करत हा दावा फेटाळून लावला आहे. तलवार चोरी गेल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून, ती तलवार वाकोजीबुवा मठात सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मंदिर संस्थानच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, मंदिरातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने मंदिर वास्तूतील आत्मबल वृद्धीसाठी १६ जून २०२५ रोजी वाराणसीच्या प.पू. श्री गणेश्वर द्रविड शास्त्री यांच्या उपस्थितीत दुर्गासप्तशती पाठाचा होम-हवन विधी झाला होता. त्यावेळी पूजा व शस्त्र शक्ती स्थापन करण्याची प्रक्रिया विधिवत पार पडली होती.
या विधीनंतर संबंधित तलवार वाकोजीबुवा मठातील महंत तुकोजीबुवा गुरु बजाजीबुवा यांच्या ताब्यात देण्यात आली असून, आजही ती तलवार मठात सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काही माध्यमांतून तलवार चोरी झाल्याच्या बातम्या येत असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसून चुकीच्या असल्याचेही मंदिर समितीने सांगितले आहे.
अरविंद बोळंगे (तहसीलदार तथा व्यवस्थापक, श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान