
धाराशिव (प्रतिनिधी) – पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खंडणीसाठी गुंडांनी काठीने मारहाण केली आहे. विशेष म्हणजे काम करायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावेच लागतील असे म्हणत बेदम मारहाण करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना लोहारा तालुक्यातील धानोरी शिवारात पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत घडली आहे. पवनचक्की खंडणीतूनच वाल्मीक कराड नावाचा अक्का निर्माण झाला. तसा धाराशिव जिल्ह्यात होऊ नये. त्यामुळे या खंडणीखोरांच्या वाढत्या गुंडगिरीला व दहशत माजविऱ्या गावगुंडावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी भेदरलेल्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
विशाल विश्वनाथ पांचाळ (वय ३७ वर्षे) रा. विश्वकर्मा कॉम्पेक्स ९-५८७/१०६/३० देवीनगर आळंद रोड, कलबुर्गी ता. जि कलबुर्गी राज्य कर्नाटका ह.मु. साई धाम कॉलनी, उमरगा हे सिव्हील इंजिनिअर म्हणून टाटा पावर रिनेव्हेबल एनर्जी या खाजगी कंपनीत नोकरी करीत आहेत. ते ६ महीन्यांपासून लोहारा व उमरगा तालुक्यामध्ये काम पाहतात. दि. ३० जुलै रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास नंदीपाटी ते धानुरी जाणाऱ्या डांबरी रोडवर कंपनीच्या पवनचक्कीचे पाते घेवून जाणारा ट्रक क्रमांक (जी.जे २७ टी.जी. ०९१५) ही गाडी विशाल कर्ण जमादार (कोळी) याने त्याची स्वीप्ट डीझायर गाडी क्रमांक (एम एच १२ एम.एल. २२४२) ही आडवी लावून तो ट्रक अडवून ठेवली होती. तो ट्रक जमादार सोडत नसल्यामुळे सुयोग ऊर्जा कंपनीचे साईट इन्चार्ज संतोष बाळकृष्ण निकम यांनी पांचाळ यांना त्या ठीकाणी जावून काय परीस्थिती आहे, तो गाड्या का सोडत नाही ! हे पाहण्यासाठी गेले. सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास पांचाळ, परमेश्वर रामदास सुर्यवंशी, कोना व्यकंटा दुर्गा प्रसाद हे नंदीपाटी ते धानुरी जाणाऱ्या रोडने कंपनीची इरटीगा गाडी क्रमांक (एम एच १२ आर एन ७६५४) ने जात असताना त्यांच्या गाडीला समारुन येणारी स्वीफ्ट गाडी क्रमांक (एम एच १२ जे. एम ३३८९) ही गाडीसमोर आडवी लावून गाडीतून अजित मुसांडे, शंकर मुसांडे, सुरज साळुंके व नरहरी बाबर हे सगळेजण खाली उत्तरले. ते पांचाळ यांच्यासह सोबत असलेल्या व्यक्तीकडे गेले आणि तुम्ही आमच्या भागात काम करायचे नाही, असा दम देऊन त्यांच्या गाडीची चावी काढून घेत असताना त्यांना गाडीची चावी काढू नका असे म्हणताना अजीत मुसांडे आणि शंकर मुसांडे यांनी चापट व बुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. ते त्यांना मारहाण करु नका असे म्हणताना त्यांनी तुम्हाला धानुरी शिवारात पवनचक्कीचे काम करायचे असेल तर तुम्ही आम्हाला पैसे द्यावेत असे म्हणून शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यानंतर परमेश्वर रामदास सुर्यवंशी याने गाडी चालु करुन कंपनीचे कर्मचारी तेथून त्यांच्या कंपनीचे सुरू असलेल्या मोघा शिवारातील शेत गट नं १७०, १७१ मध्ये गेले. तिकडे देखील अजित मुसांडे, शंकर मुसांडे, सुरज साळुंके, नरहर बाबर व विशाल कर्ण जमादार (कोळी) गाडी क्रमांक (एम एच १२ एम.एल. २२४२) ही घेवून आले. त्यांनी गाडीतून खाली उतरुन हातात काठी घेऊन तुम्ही येथे काम करायचे नाही. काम करायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील असे म्हणून त्यांनी कंपनीत काम करणाऱ्या विरेंद्र महेंद्र सिंग यास सुरज साळुके, नरहरी बाबर, विशाल कर्ण जमादार (कोळी) यांनी डावे हातावर काठीने मारुन गंभीर जखमी केले तर सुब्राशीस शरदचंद्र नाईक यास अजित मुसांडे व सुरज साळुंके यांनी डोक्यात दगडाने जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली आहे. तसेच श्रीकांतकुमार सुभाष पानीग्रही यास सुरज साळुंके, अजित मुसांडे यांनी डाव्या हातावर काठीने मारुन जखमी केले आहे. तर परमेश्वर रामदास सुर्यवंशीच्या उजव्या हातावर अजित मुसांडे याने मारुन जखमी केले आहे. विशेष म्हणजे सुब्राशीस हा मोबाईलवरुन कंपनीच्या साहेबांना फोन करुन बोलत असताना रियलमी एक्स २ मोबाईल अजित मुसांडे याने हातातून घेवुन फोडून टाकला. त्यानंतर गाडी क्रमांक (जी.जे. २७ टीएफ २४२३) वर दगड मारुन काच फोडल्या. तर पवनचक्कीचे पाते घेऊन जाणारा ट्रक क्रमांक (जी. जे २७ टी.जी ०९१५) या गाडीची काच फोडून नुकसान केले. वरील सर्व जखमी उमरगा येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणी वरील आरोपींवर लोहारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता १०९, ३०८ (२), १२६ (२), ११८ (१), ११५ (२), ३५२, १८९ (२), १९१ (२), १९० व ३२४ (४) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.