
धाराशिव – : “मनातून गुंजतोय ढोल-ताशांचा सूर…” गणेशोत्सवाची चाहूल लागताच शहरात मंगलमय वातावरण तयार झाले आहे. धाराशिव येथील विजय (नाना) दंडनाईक युवामंच यांच्या वतीने गेल्या १० वर्षांपासून परंपरागत पद्धतीने सादर होणाऱ्या ‘मराठेशाही ढोल-ताशा पथका’च्या वाद्य पूजन व शुभारंभ सोहळ्याचे आयोजन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व वाद्य पूजन मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पथकाचे प्रमुख रोहित दंडनाईक व सर्व सहकाऱ्यांना मल्हार पाटील यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. विजय (नाना) दंडनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गेल्या दशकभरात उंच भरारी घेतली आहे.
ढोल-ताशांच्या निनादात शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पथकांचा सराव सुरू झाला आहे. पावसाच्या सरी आणि ढोल-ताशांच्या कडकडाटाने वातावरण भारावून गेले आहे. शहरातील विविध ढोल-ताशा पथकांमध्येही सरावास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा पाहायला मिळत आहे.
या सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक अॅड. मिलिंद पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, विजय (नाना) दंडनाईक, सतीश दंडनाईक, भाजपा शहराध्यक्ष अमित शिंदे, माजी नगराध्यक्ष सुनील (तात्या) काकडे, प्रा. चंद्रजीत जाधव, राजसिंह राजेनिंबाळकर, अक्षय ढोबळे, विनोद गपाट, पांडुरंग लाटे सर यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
धाराशिव शहरात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तयारीला सुरुवात झाली असून, ढोल-ताशा पथकांमुळे उत्सवात अधिक रंग भरला जाणार आहे.