
धाराशिव – जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्या अपहरण व मारहाण प्रकरणात शहर पोलीस गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप आता खुद्द मडके यांनीच केला आहे.
या घटनेनंतर थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, पोलीस गुन्हा दाखल करण्याऐवजी उलटपक्षी विचारतात – “घटना घडली तेव्हा तुझे तीन बॉडीगार्ड कुठे होते?”
नेमकं काय घडलं?
२३ जुलै रोजी सायंकाळी हॉटेलसमोर उभ्या असलेल्या नागेश मडके यांना चारचाकी गाडीतून आलेल्या ४-५ अज्ञातांनी सेल्फीच्या बहाण्याने गाडीत ओढून अपहरण केले. गाडीत बेदम मारहाण करून त्यांना जीव मारण्याची धमकी देण्यात आली आणि वडगाव (सि.) येथील पुलावर फेकून देण्यात आले.
“तू हे बंदुकीसाठी करतोस?”
मडके यांनी सांगितले की, पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता एका अधिकाऱ्याने “तू हे सगळं बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी करतोस का?” असा संशयपूर्वक प्रश्न विचारून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली.
पोलीस अधीक्षकांकडे धाव
या प्रकारामुळे मडके यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या ते जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत असून, गुन्हा नोंद न होणे आणि अपहृत व्यक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने गुन्हेगारीपेक्षा पोलिसांवरच संतापाचा भडका उडत आहे.