
अकलूज – अकलूज नगरपरिषद आणि सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २ ऑगस्ट व रविवार, दि. ३ ऑगस्ट रोजी अकलूजमध्ये आपदा मित्र/सखी आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांसाठी शोध व बचाव कार्याचा सराव अभ्यास आयोजित करण्यात आला.
रायगड येथे आपत्ती व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण पूर्ण करून परतलेल्या स्वयंसेवकांसोबत हा सराव आयोजित करण्यात आला होता. अकलूज नगरपालिका मुख्याधिकारी श्री. दयानंद गोरे यांच्या सहकार्याने, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी श्री. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार हे प्रशिक्षण घेण्यात आले, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. शक्तिशागर ढोले यांनी दिली.
प्रशिक्षणादरम्यान जलप्रलय, इमारत कोसळणे, आग लागणे अशा विविध आपत्तीमधील त्वरित प्रतिसाद, प्राथमिक उपचार, बचाव उपकरणांचा वापर, सुरक्षितता व समन्वय यांचा सखोल अभ्यास व प्रत्यक्ष सराव घेण्यात आला. सोलापूर रेस्क्यू स्क्वाडचे प्रशिक्षक अनिल सल्ले यांनी उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे अकलूज शहराची आपत्ती प्रतिकारशक्ती व स्थानिक यंत्रणांची कार्यक्षमता वाढली असून, भविष्यातील संकटांमध्ये प्रभावी हस्तक्षेप करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
श्री. ढोले यांनी सांगितले की, “या प्रशिक्षणामुळे आपदा मित्र/सखींचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची तयारी दर्शवली आहे.”