
धाराशिव – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चापूर्वी सरकारसोबत कोणतीही चर्चा न करण्याची ठाम भूमिका मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे. “आधी मागणी मान्य करा, मगच चर्चा” असा त्यांचा पवित्रा आहे.
धाराशिव दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “आम्ही ओबीसीत असल्याचे पुरावे सरकारकडे दिले आहेत. तरीदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाळाटाळ करत असतील, तर लक्षात ठेवा – मराठ्याशिवाय राज्यात सत्ता येत नाही. मोर्चापूर्वी दबाव आणण्याचा, अटक करण्याचा किंवा लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न करू नका. आंतरवली सराटीची पुनरावृत्ती केल्यास तुम्हालाच नव्हे तर पंतप्रधानांनाही हे जड जाईल.”
ओबीसी समाजाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले, “मी ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळवून देताना जात पाहिली नव्हती. मी ओबीसी समाजाचा विरोधक नाही. त्यामुळे माझ्या मराठा समाजाला आरक्षण देताना तुम्हीही विरोध करू नका.”
मराठा आरक्षणाच्या लढ्यातील ही ठाम भूमिका आणि सरकारला दिलेला थेट इशारा यामुळे 29 ऑगस्टचा मुंबई मोर्चा राजकीय दृष्ट्या अधिक गाजण्याची चिन्हे आहेत.