
धाराशिव (प्रतिनिधी) -: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार, दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, सकाळी ११:४० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
या जनता दरबारात महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या अडचणी, समस्या, तक्रारी तसेच सूचनांचा प्रत्यक्ष मंत्र्यांच्या उपस्थितीत निवेदनाद्वारे स्वीकार केला जाणार आहे. नागरिकांनी आपल्या समस्या थेट मंत्र्यांपुढे मांडण्याची ही चांगली संधी असून, जिल्हा प्रशासनाने यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे.
यावेळी भूमी अभिलेख, मुद्रांक शुल्क, नोंदणी, मालमत्ता प्रश्न, जमीन वाटप, शेतजमिनीच्या तक्रारी, जात प्रमाणपत्र तसेच इतर महसूल विषयक बाबींबाबत नागरिकांनी आपली कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना महसूल विभागाशी निगडीत विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे हा जनता दरबार नागरिकांसाठी उपयुक्त ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.