
धाराशिव :- धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी पुन्हा एकदा महिलाराज सुरू होत असून, वसुधा फड यांच्या बदलीनंतर राज्य शासनाने प्रशासकीय कारणास्तव बीड नगरपालिकेतील कार्यरत मुख्याधिकारी नीता अंधारे यांची नियुक्ती केली आहे. दिनांक १ ऑगस्ट रोजी शासन आदेशानुसार ही बदली करण्यात आली असून, त्यांच्या अनुभवाचा लाभ आता धाराशिव नगरपालिकेला मिळणार आहे.
वसुधा फड यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रशासकीय यंत्रणेचे सक्षमपणे नेतृत्व करत, नगरपरिषदेच्या कामकाजात शिस्त, नियोजन व कर्मचारी वर्गाशी सलोख्याचे संबंध ठेवत उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या विकास योजना यशस्वीरीत्या राबवण्यात आल्या. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेत सकारात्मक बदल घडवले. त्यामुळे त्या एक उत्तम प्रशासक म्हणून ओळखल्या जातात.
वसुधा फड यांच्या बदलीनंतर काही दिवस धाराशिव नगरपालिकेचा कारभार नगर प्रशासन सहआयुक्त त्रिंबक ढेंगळे पाटील यांनी सांभाळला होता. मात्र आता कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून नीता अंधारे यांची नेमणूक झाल्यामुळे शहराच्या विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नीता अंधारे यांना बीड जिल्ह्यात उत्कृष्ट प्रशासकीय अनुभव आहे. त्यांनी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्यक्षेत्र अधिक मजबूत केले. त्यांच्या अनुभवाचा फायदा धाराशिव नगरपरिषदेला निश्चितच होणार आहे.
एक उत्तम प्रशासक म्हणून वसुधा फड यांच्या कार्याचा आदर राखत, आता नीता अंधारे या देखील तितक्याच समर्थपणे नव्या जबाबदारीत यशस्वी होतील, असा विश्वास शहरवासीय व्यक्त करत आहेत. महिलांचे नेतृत्व व प्रशासनातील कार्यक्षमता यांचा उत्तम मिलाफ म्हणून धाराशिव नगरपालिकेतील ‘महिलाराज’ प्रेरणादायी ठरणार आहे.