
धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात अलीकडच्या काही दिवसांत सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांच्या दुकानांवर चोरीचे व फोडाफोडीचे प्रकार घडल्याने व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव सराफ व सुवर्णकार फेडरेशन असोसिएशनने जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देत या घटनांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
दि. ०३ जुलै २०२५ रोजी धाराशिव शहरात पहाटेच्या सुमारास काही सराफी दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर १५ जुलै रोजी लोहारा शहरातील जयलक्ष्मी माऊली सराफ दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी चांदीच्या वस्तू चोरून नेल्या. तसेच आष्टा कासार गावातही भाग्यश्री अलंकार नावाचे दुकान फोडल्याची घटना उघडकीस आली.
या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणांमध्ये गांभीर्याने लक्ष घालून दोषींना तात्काळ अटक करावी व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देताना धाराशिव सराफ व सुवर्णकार फेडरेशन असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी माळी, कार्यकारी अध्यक्ष कृष्णाजी डहाळे, जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष तानाजी मुंडे, जिल्हा संघटक कृष्णाजी नाईकनवरे, संयोजक राजेश कदम, सचिव मयुर जालनेकर, कोषाध्यक्ष सच्चिदानंद पोद्दार, तसेच आनंद माळी, संतोष खरमाटे, शशिकांत सानप, योगेश शहाणे, प्रवीण माळी, अतुल माळी, स्वप्नील भालेकर, गणेश टेहरे, सौदागर माळी व इतर व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फेडरेशनच्या वतीने पोलिस प्रशासनाशी रचना, संवाद व सहकार्य राखत व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.