
सोलापूर (प्रतिनिधी): अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर मराठा समाजात तीव्र संताप उसळला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना निवेदन सादर करून आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (खूनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात असे म्हटले आहे की, हल्लेखोरांमध्ये दीपक काटे या सराईत गुन्हेगाराचा समावेश असून, हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग आहे. त्यामुळे हल्ल्याच्या गांभीर्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. समाजाच्या मते, प्रवीण गायकवाड हे मराठा समाजातील प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्यावर शाईफेक व मारहाण होणे ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे.
“आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट?”
हल्ल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली असली, तरी त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई ऐवजी ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली जात असल्याचा आरोप समाजकडून करण्यात आला आहे. “आरोपींना दूध देऊन मानपान केला जात आहे, हे आम्ही सहन करणार नाही,” असा रोष समाजबांधवांनी व्यक्त केला.
३०७ अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे – अन्यथा तीव्र आंदोलन
राज्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणात कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यालाही तसाच कायदेशीर दर्जा मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका समाजाने मांडली आहे. अन्यथा अक्कलकोट बंद, सोलापूर जिल्हा बंद आणि गरज पडल्यास राज्य बंदची हाक दिली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात तणावाचे वातावरण असून, पोलिस प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
उपस्थित प्रमुख नेते व पदाधिकारी:
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप कोल्हे, प्रताप चव्हाण, सकल मराठा समाजाचे राजन जाधव, माऊली पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे भोसले, शहरप्रमुख शिरीष जगदाळे, तसेच मराठा समाजातील तुकाराम मस्के, भाऊ आवताडे, गणेश देशमुख, विनोद भोसले, गणेश डोंगरे, शेखर फंड चेतन चौधरी, महेश कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.