
उपळा येथे ४८ वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा
धाराशिव (प्रतिनिधी) – पूर्वी वर्ग तुकडीसाठी विद्यार्थी संख्या ग्राह्य धरली जात नव्हती. २० विद्यार्थी असले तरी सरकार त्या शाळांना टिकविण्यासाठी प्रोत्साहन देत होते. त्यातच सध्याच्या सरकारचे धोरण शिक्षण व्यवस्था मोडून काढण्याचे असून दररोज नवीन जीआर काढले जात आहेत. त्या माध्यमातून अनुदानित शाळा बंद करायच्या असून स्वनिधीच्या शाळा आणायच्या आहेत. तसेच सर्वसामान्यांना शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच शिक्षकांनी पहिल्यासारखे स्वतःला झोकून देऊन वाहून घेऊन अध्यापन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक लिंबराज टिकले यांनी दि.१० ऑगस्ट रोजी केले. दरम्यान, पाचवीच्या ५५ विद्यार्थ्यांना या बॅचच्यावतीने गणवेशाचे वाटप करण्यात आले.
धाराशिव तालुक्यातील उपळा (मा) येथील हरिभाऊ घोगरे हायस्कूलच्या १९७६-७७ मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्याध्यापक भागवत घोगरे, पी.डी. देशमुख, बी.जी. चव्हाण, बी.डी. बाराते, मुकणे, भाई उद्धवराव पाटील शाळेचे मुख्याध्यापक अमोल घोगरे, महादेव गवाड, केशव लोमटे, प्रभाकर घोगरे, भागवत घोगरे आदींसह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना टिकले म्हणाले की, गुरु द्रोणाचार्य यांच्यापूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शिक्षकांकडे जावे लागत होते. मात्र गुरु द्रोणाचार्य यांनी सर्वप्रथम कौरवांच्या घरी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देण्याची प्रथा सुरू केली. तेव्हापासूनच शिक्षणाची अधोगती होण्यास सुरुवात झाली असल्याचे सांगितले. तर महाभारताच्या काळापासून शिक्षण व्यवस्थेला आहोटी लागली असल्याचे त्यांनी उदाहरणासह सांगितले. तसेच आज शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे बऱ्याच शाळांची शिस्त बिघडलेली आहे. त्यामुळे शासनाने किमान आजच्या काळात शिक्षकांच्या कुवतीप्रमाणे त्यांना सन्मानित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे शिक्षकांनी देखील पहिल्यासारखेच झोकून देऊन स्वतःला वाहून घेऊन अध्यापन केले तरच सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शाळा भविष्यात टिकतील. अन्यथा शाळा देशोधडीला लागतील असा गंभीर इशारा त्यांनी दिला. तर भागवत घोगरे म्हणाले की, त्या काळात विद्यार्थी शिक्षकाला समोर दैवत मानून शिक्षण घेत होते. मात्र आज ती परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे पुढील पिढींना शिक्षण हे मात्र भाषेतून देणे आवश्यक आहे. जर दिले तर त्याला शिक्षणाची संकल्पना समजेल व तो त्या विषयात पारंगत होईल असे त्यांनी सांगितले. तसेच
पी.डी. घोगरे म्हणाले की, समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय याबाबत जर कोणी अन्याय करीत असेल तर त्याविरुद्ध बोलण्याचे संस्कार आपल्या भावी पिढीला द्यावेत अशी आवाहन त्यांनी केले. तसेच महादेव गव्हाड म्हणाले की, बगल मे छुरी, मुह मे राम ! म्हणणाऱ्यांची संख्या वाढलेली असून ती नेस्तनाबून करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी चव्हाण, बाराते, मुकणे, अमोल घोगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर माजी विद्यार्थी निलावती लोमटे, नलिनी पडवळ, बालिका घोगरे, कांचन घोगरे, सरोजिनी पडवळ, सुनंदा पडवळ, मीना झाल्टे, रत्नमाला कस्पटे, खाशा पडवळ, सत्यशीला घोगरे, पांडुरंग गवाड, महारुद्र मुंडे, प्रकाश सरवदे, पांडुरंग हुकीरे, राजेंद्र पडवळ, दिनकर सोनटक्के, पुंडलिक भुसारे, रामा सोनटक्के, साहेबराव पडवळ, महादेव गोसावी, रंगनाथ काशीद, गंगाधर गंगावणे, शहाजी जगदाळे, चंद्रकांत लोमटे, देविदास कोळेकर, हनुमंत लोमटे, अशोक सुरवसे, सुखदेव व्हटकर, हनुमंत व्हटकर, त्रंबक व्हटकर, तानाजी पडवळ, राजेंद्र पानढवळे, शहाजी लामकरे, यशवंत शेटे, दिलीप शेटे, संताजी वीर, हेमंतकुमार अहिरे, विलास गंगावणे, चंद्रकांत फड, अशोक गवाड, भारत काळे आदींसह इतर सर्व माजी विद्यार्थ्यांना आपला अनुभव कथन करताना गहिवरून आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनकर सोनटक्के यांनी तर सूत्रसंचालन रामा (काका) सोनटक्के यांनी व उपस्थितांचे आभार ॲड पांडुरंग गव्हाड यांनी मांडले. यावेळी माजी मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात केलेले कारनामे अनुभवलेले अनुभव व्यक्त करण्याची संधी त्यांना तब्बल ४८ वर्षांनी प्राप्त झाली. त्यामुळे त्यावेळचे दिवस व आज कोणी कोणत्या क्षेत्रात कार्य केले व करीत आहे. याची माहिती मिळण्याबरोबरच त्यांना हितगुज साधता आले. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर शालेय जीवनातील आठवणींचा ठेवा स्पष्टपणे दिसून ते प्रफुल्लित होऊन त्या आठवणीत रंगून गेल्याने संपूर्ण वातावरण शालेय जीवनातील विविध प्रसंगाने भारावून गेले होते.