
धाराशिव (प्रतिनिधी) – सध्या इयत्ता १२ वी व सीईटी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे इंजिनिअरिंग प्रवेशासाठी सीईटी अंतर्गत कॅप राऊंड सुरू आहेत. यामध्ये दि. २२ जुलैपर्यंत अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय पसंती क्रमांक देण्यासाठी ग्राह्य व पात्र केलेले आहे. मार्च-एप्रिल २०२५ महिन्यात परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ते अर्ज करता आलेले आहेत. मात्र, जुलै २०२५ मध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल दि.२९ जुलै रोजी लागलेले आहेत. त्यामुळे त्यांनी निकाल लागल्यानंतर अर्ज दाखल केलेले आहेत. कॅप राऊंड सुरू असून जुलैमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पसंती क्रमांकसाठी पात्र धरले जात नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे जुलैमध्ये परीक्षा दिलेल्या व उत्तीर्ण झालेल्या त्या सर्व विद्यार्थ्यांना कॅप राऊंडसाठी पात्र ठरवून त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी पालक मल्लिकार्जुन दशरथ सोनवणे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांसह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्यासह संबंधित मंत्र्याकडे दि.६ ऑगस्ट रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सध्या इंजिनिअरिंग प्रवेशासाठी सीईटी अंतर्गत कॅप राऊंड प्रक्रिया सुरू आहे. मात्र यासाठी दि. २२ जुलैपर्यंत अर्ज दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या कॅप राऊंडमध्ये पसंती क्रमांक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. जुलै २०२५ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी १२ वी विज्ञानची परीक्षा दिलेली आहे, त्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने दि. २९ जुलै रोजी लागलेला आहे. त्याची मार्कशीट देखील अद्यापपर्यंत आलेली नाहीत. यामध्ये माझी कन्या भावना हिचा देखील समावेश आहे. तिने इंजिनिअरिंगसाठी दि.१ ऑगस्ट रोजी अर्ज दाखल केला. तर पडताळणीनंर पुन्हा दि.२ ऑगस्ट रोजी तो अर्ज दाखल केला. त्यानंतर सीईटीचा कॅप राऊंड प्रक्रियेसाठी मेसेज येणे क्रमप्राप्त होते. मात्र, तो मेसेज आलेला नाही. त्यामुळे दि.६ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाची पसंती क्रमांक टाकण्यासाठी वेबसाईटवर गेलो असता तो ऑप्शनच येत नाही. त्यामुळे सीईटी हेल्पलाइन क्र. ९१७५१०८६१२ या क्रमांकावर ती संपर्क साधला असता ज्या विद्यार्थ्यांनी दि.२२ जुलैपर्यंत अर्ज दाखल केलेले आहेत, त्यांच्यासाठी कॅप राऊंड आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत, त्यांना कॉलेजच्या इन्स्टिट्यूट स्तरावर प्रवेश घ्यावा लागेल असे सांगितले. विशेष म्हणजे शासनाने विद्यार्थ्यांना जुलै मध्ये रीतसर फेर परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी जुलैमध्ये परीक्षा दिली व उत्तीर्ण झाले त्या विद्यार्थ्यांचा निकाल दि.२९ जुलै रोजी लागला आहे. त्यामुळे दि.२२ जुलै पर्यंत अर्ज भरणे अशक्य होते. कारण त्यासाठी आवश्यक असणारे निकष यामध्ये विद्यार्थी पास किंवा नापास तसेच त्या विद्यार्थ्यास किती गुण प्राप्त झाले आहेत हे माहिती होऊ शकत नव्हते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी फेर परीक्षा दिली आहे व ज्यांनी दि.३३ जुलै नंतर इंजिनियरिंगसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांना नियमित विद्यार्थ्यासोबत कॅप राऊंडसाठी ग्राह्य धरणे व पात्र ठरविणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास सदरील विद्यार्थ्यांकडून फीस भरमसाठ आकारली जाणार आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांसाठी हे अन्यायकारक असून दि.२२ जुलै नंतर अर्ज दाखल केलेल्या आणि राज्यातील फेरपरीक्षा दिलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना शासनाच्या (सीईटी) ऑनलाईन प्रक्रियेद्वारे त्या राऊंडसाठी पात्र ठरविण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा, अशी आग्रही मागणी सोनवणे यांनी केली आहे.