
अंबादास दानवे यांच्या कार्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून गौरव
मुंबई (प्रतिनिधी) – राज्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यकाळाची समाप्ती होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत एक प्रेरणादायी उदाहरण मांडले. “एस.टी. बस चालकाचा मुलगा आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्य विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, ही बाब अभिमानास्पदच आहे. कोणी कुठेही जन्माला आला तरी आपल्या कर्तृत्वाने मोठा होऊ शकतो, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आणि लोकशाहीने सामान्यांना दिलेली मोठी देणगी आहे,” अशा शब्दांत फडणवीसांनी भावना व्यक्त केल्या.
२९ ऑगस्ट रोजी अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ पूर्ण होत असून, या पार्श्वभूमीवर आयोजित निरोप समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विविध मंत्री, गटनेते आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दानवे यांच्या प्रामाणिक आणि अभ्यासू कामगिरीचे कौतुक करताना लोकशाहीतील समान संधीच्या मूल्यांचीही आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, “अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षाच्या भूमिकेचे चोख पालन करत अत्यंत जबाबदारीने आपली जबाबदारी पार पाडली.”