
धाराशिव – स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होत, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत धाराशिव शहरातील ख्वॉजा नगर येथील तौफिक काझी, इरफान शेख यांच्यासह शेकडो मुस्लिम तरुणांनी शिवसेना (ठाकरे गट) मध्ये जल्लोषात प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने शहरात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट झाले असून, नवचैतन्याचे वातावरण तयार झाले आहे.
तौफिक काझी यांना अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्षपद, तर इरफान शेख यांना धाराशिव शहर अल्पसंख्याक अध्यक्षपद देण्यात आले आहे.
हा प्रवेश आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते आणि शौकत शेख व अबरार कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, कळंब तालुकाप्रमुख सचिन काळे, जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर, कलीम कुरेशी, छोटा साजिद व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या मोठ्या प्रवेशामुळे आगामी काळात मुस्लिम समाजातील तरुणांचा शिवसेनेकडे कल वाढण्याची शक्यता असून, स्थानिक राजकारणात या घटनाक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.