Spread the love

तुळजापूर – हैदराबादहून पंढरपूरच्या दिशेने निघालेले मुंबईच्या हेलिगो चार्टर्ड कंपनीचे हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी चुकून थेट तुळजापुरात उतरल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली. तुळजाभवानी मंदिरावर काही वेळ घिरट्या घालून ते थेट नळदुर्ग रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हेलिपॅडवर उतरले.

या प्रकाराची कोणतीही पूर्वसूचना महसूल, पोलीस वा बांधकाम विभागाला न मिळाल्याने संबंधित यंत्रणांची धावपळ उडाली. सहायक पोलीस निरीक्षक विजय पवार व कर्मचारी माने यांनी तातडीने तपासणी केली. पायलटने पंढरपूरसाठी घेतलेल्या परवानगीची माहिती दिल्यानंतरच समजले की हे चुकून तुळजापुरात आले.

प्रशासनाने हेलिकॉप्टर कंपनीवर १०,००० रुपयांचा दंड आकारला. दंड भरल्यानंतर सायंकाळी सव्वा पाच वाजता हे हेलिकॉप्टर तुळजापुरातून उड्डाण करून निघून गेले.

तुळजापूर हे महत्त्वाचे धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने सुरक्षा यंत्रणांसाठी अशा विनापरवानगी लँडिंग प्रकार गंभीर मानला जात आहे. पायलट आणि हेलिकॉप्टर कंपन्यांनी यापुढे अधिक दक्षता बाळगावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.