
धाराशिव – शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेलं नवीन बसस्थानक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असून, प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भव्य उद्घाटनाच्या थाटामाटानंतरही येथे आवश्यक ते काम अपूर्णच राहिल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे.
बसस्थानकाच्या प्लॅटफॉर्मलगत काँक्रिटीकरण होणे अत्यावश्यक होते, मात्र प्रत्यक्षात फक्त मुख्य कोनशीलेच्या ठिकाणीच काँक्रीट टाकण्याचा प्रयोग करण्यात आला. त्यामुळे उर्वरित भाग पूर्णतः मातीचा असून, पावसाळ्यात तो चिखलात परिवर्तित होतो. यामुळे बस चालक, वाहक आणि प्रवाशांना चिखलातून वाट काढत बसपर्यंत पोहोचावं लागतं.
ही परिस्थिती पाहता प्रशासनाने केवळ औपचारिक उद्घाटन करून जबाबदारीतून पळ काढल्याचं चित्र जनतेसमोर आलं आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय, बस चालक-वाहकांचा होणारा त्रास आणि एकूणच सार्वजनिक सुविधांतील बेजबाबदारी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.