
सांगडे जैसे थेच…
डिजिटल बॅनरपासून शहराचे होणारे विद्रूपीकरण थांबवण्याचे नगरपालिकेचे आश्वासन?
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची धाराशिव नगरपालिकेकडून पायमल्ली
धाराशिव : शहराच्या मुख्य रस्त्यांवरील पथदिव्यांच्या पोलवर अनधिकृतपणे बसवलेले बॅनर सांगडे आजही जैसे थेच स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी थेट आदेश देऊनही ही सांगडे हटवण्यात अपयशी ठरलेल्या धाराशिव नगरपालिकेच्या प्रशासनाची पथदिव्यांच्या पोलवरील होर्डिंगचे सांगडे काढण्यास नगरपालिका धजत नसल्याचे दिसत आहे.
शहरातील सौंदर्य, वाहतुकीचे सुरळीत नियोजन आणि सुरक्षितता या सर्व गोष्टी धोक्यात टाकणाऱ्या या सांगड्यांवर वर्षानुवर्षे कोणतीही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. काही महिने आधी नगरपालिकेने डिजिटल बॅनर व सांगडे हटवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात हे सांगडे शहराच्या प्रत्येक चौकात, मुख्य रस्त्यांवर, सार्वजनिक इमारतींसमोर अजूनही विद्रूपपणे लटकलेले दिसत आहेत.
पोलावरील सांगडे धोकादायक स्थितीत असल्याने काही ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, काही सांगडे गंजलेले व डागाळलेले आहेत. त्यातच नव्या डिजिटल बॅनरने शहराचा चेहरामोहरा आणखी विद्रूप केला आहे.
महत्त्वाचे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानंतरही ही सांगडे न काढणे म्हणजे प्रशासकीय आदेशाला केराची टोपली दाखवण्यासारखे आहे. शहरातील सुशोभीकरण, स्वच्छ भारत अभियान, आणि स्मार्ट सिटीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही बाब असून, नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शहराच्या सौंदर्याचे रक्षण करण्यासाठी आणि नियमांची कडक अंमलबजावणी होण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.