
धाराशिव – शहरातील नागरिकांसाठी व्यायामाचे एकमेव ठिकाण असलेल्या तुळजाभवानी स्टेडियमवर खासगी क्रीडा अकॅडमींनी मोठ्या प्रमाणावर जागा व्यापल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना जागेअभावी कसरत करणेही अवघड झाले आहे.
तुळजाभवानी स्टेडियम हे शहरातील धावपटू, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी व्यायामाचे प्रमुख केंद्र आहे. मात्र, गेल्या काही काळापासून येथे विविध खासगी अकॅडमींचे प्रशिक्षण वर्ग मोठ्या संख्येने भरत आहेत. त्यामुळे स्टेडियमवर खेळाडू आणि प्रशिक्षणार्थींची मोठी गर्दी उसळत असून, मोकळ्या जागेचा अभाव निर्माण झाला आहे. यामुळे व्यायामासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना अडथळा निर्माण होत असून, गर्दीमुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे.
या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “हे स्टेडियम केवळ खासगी अकॅडमींसाठी नसून, ते सर्व नागरिकांसाठी खुले आहे. सार्वजनिक सुविधा सर्वांना वापरता आल्या पाहिजेत,” अशी स्पष्ट भूमिका नागरिकांनी मांडली आहे. या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तक्रार करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
स्टेडियमचा वापर करणाऱ्या नागरिकांनी स्थानिक प्रशासन आणि क्रीडा विभागाकडे यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. सर्वसामान्यांना व्यायाम करता यावा यासाठी एकतर स्वतंत्र वेळ निश्चित करावी किंवा विशिष्ट जागा राखून ठेवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.