
धाराशिव ता. 14: कळंब तालुक्यातील लोहटा (पूर्व) गावाला महसुली ओळख मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला होता अखेर या गावास आता महसूली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिली आहे. आमदार कैलास पाटील यांच्या प्रश्नामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही बैठक घेऊन प्रशासनास सूचना दिल्या.
यावेळी कृषीचे प्रधान सचिव विकास रस्तोगी , जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, महसूलचे उपसचिव संजय बनकर तर व्हिसी द्वारे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव आदी उपस्थित होते.
कळंब तालुक्यात लोहटा पूर्व हे गाव आहे. बोरगाव (के) लोहटा, हिंगणगाव, सावरगाव (काळे), पिंपळगाव (टो) आणि करंजकल्ला या गावातील काही घरांचे लोहटा (पूर्व) या नवीन गावाची निर्मिती झाली. त्या शिवारांचे एकत्रीकरण झाले नसल्यामुळे लोहटा (पूर्व) गावाला महसुली शिवार दर्जा मिळाला नाही. हा विषय आमदार कैलास पाटील यांनी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सभागृहात मांडला. त्यानंतर महसूल विभाग खडबडून जागा झाला. शासनाच्या योजना ऑनलाईन असून लोहटा पुर्व गावासाठी महसूली दर्जा नसल्यामुळे येथील ग्रामस्थांना योजनापासून मुकावे लागत होते.
आमदार पाटील म्हणाले की, ग्राम पातळीवरील ऑनलाइन कामे करण्यास व शेतकऱ्यांसाठी डिजिटल माहिती प्रणाली (ॲग्रिस्टॅक) नसल्याने शेतकऱ्यांना पीकविमा, अनुदान व इतर कृषी विषयक लाभ मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांसह शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत व्हिलेज व डिजिटल माहिती प्रणाली कोड (ॲग्रिस्टॅक) तयार करण्याच्या सूचना महसूल मंत्री यांनी बैठकीत दिल्या. शिवाय गावाचा प्रस्ताव 30 दिवसाच्या आत शासनास सादर करावा असे आदेश यावेळी देण्यात आले. याची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर निश्चित केल्याचं आमदार पाटील यांनी सांगितले.
सभागृहात आमदार पाटील यांनी प्रश्न मांडल्यानंतर महसूल मंत्र्यांकडून उत्तर देताना १५ दिवसांत बैठक घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे सभागृहात सांगितले होते. त्यानुसार ही बैठक झाली असून त्यामुळे लोहटा (पूर्व) गावाला महसुली दर्जा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याचे समाधान आमदार पाटील यांनी व्यक्त केले आहे.