
मित्र’ संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने ‘MahaSTRIDE’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत धाराशिव जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एक महत्त्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत District Strategy Plan ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली.
‘MahaSTRIDE’ या प्रकल्पाचा उद्देश हा प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानिक गरजा आणि बलस्थान लक्षात घेऊन विशेष विकास आराखडे तयार करणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, असा आहे.
या प्रकल्पामुळे जिल्ह्यांच्या विकासाला दिशा मिळेल आणि महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत प्रत्येक जिल्ह्याचा सक्रिय सहभाग सुनिश्चित होईल.
महास्ट्राइड (MahaSTRIDE) प्रकल्पाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देणाऱ्या ३१ प्रकल्पांवर भर देण्याचे ठरले आहे.
जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न हे रू.१,९०,३८३ असून सकल राज्यांतर्गत उत्पन्नात जिल्ह्याचा वाटा १% आहे. २०२७ पर्यंत तो तेव्हाच्या उत्पन्नाच्या १.२% करण्याचे उद्दीष्ट असुन देशाच्या व राज्याच्या विकासासोबतच जिल्हा देखील मागे रहायला नको यासाठी प्रभावीपणे काम सुरू असल्याची माहिती ‘मित्र’चे उपाध्यक्ष तथा आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने ‘मित्र’ संस्थेच्या माध्यमातून सल्लागार नेमण्यात आला असुन प्रत्येक जिल्ह्यात ४ तज्ञ व्यक्तींची नेमणुक करण्यात आली आहे.
जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सकारात्मकतेने सहभागी होत काम करणे आवश्यक आहे. राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना व ३१ महत्वकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान व दरडोई उत्पन्न वाढविण्यास नक्कीच मदत होणार आहे.
‘MahaSTRIDE’ या प्रकल्पामुळे जिल्ह्यांच्या अर्थकारणाला मोठी गती मिळेल आणि महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत आपल्या सर्वांच्या सहकार्याने व सहयोगाने जिल्ह्याचा सन २०२२ मध्ये ४.४ बिलीयन डॉलरचा (अंदाजे रू.३८,२६४ कोटी) सहभाग सन २०२७ पर्यंत १३.१४ बिलीयन डॉलर ( रू. १,१४,२७० कोटी अंदाजित) पर्यंत सुनिश्चित होईल, असा विश्वास आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.