
धाराशिव – जागतिक युवक कौशल्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगार व उद्योग क्षेत्रात नवे क्षितिज खुले झाले असून, महायुती सरकारच्या रोजगाराभिमुख धोरणांचा लाभ घेण्याचे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
शासनाच्या ITI संस्था, कौशल्य विकास केंद्रे, सहकार प्रकल्प, तसेच मुद्रा योजना, स्टँड अप इंडिया योजना यांसारख्या उपक्रमांद्वारे तरुणांना केवळ नोकरी मिळण्यास नव्हे, तर स्वतंत्र उद्योजक म्हणून घडण्याची संधी मिळत आहे. “तरुणांनी फक्त शासकीय नोकऱ्यांचा विचार न करता स्टार्टअप्स, कृषी प्रक्रिया उद्योग याकडेही वळावे,” असे आवाहन श्री. कुलकर्णी यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रोजगार व कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या योजनांमुळे जिल्ह्यातील शेकडो युवकांना आर्थिक स्वावलंबन मिळाले आहे. ग्रामीण भागातील युवकांपर्यंत या योजनांचा प्रभावीपणे लाभ पोहोचवण्यात धाराशिवचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये प्रशिक्षण केंद्रे आणि उद्योगविकास प्रकल्प उभारले गेले आहेत.
“आजचा तरुण केवळ नोकरी मागणारा नसून, संधी शोधणारा आणि संधी निर्माण करणारा आहे,” असेही श्री. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.