
पुणे – रेल्वेच्या पुणे व सोलापूर विभागाच्या विभागीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पुणे येथे पार पडली. या बैठकीस रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री धरम वीर मीना, खासदार डॉ. सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, डॉ. शिवाजी काळगे, श्री निलेश लंके, श्री धैर्यशील मोहिते पाटील, भाऊसाहेब वाघचौरे आणि श्री विशाल पाटील उपस्थित होते.
या बैठकीत धाराशिव, बार्शी, लातूर व संपूर्ण मराठवाडा परिसराच्या रेल्वे विकासाबाबत अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या. अमृत भारत योजनेअंतर्गत बार्शी रेल्वे स्थानकाचा समावेश करून त्याचा सर्वांगीण विकास करावा, धाराशिव स्थानकावरील सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा वाढवण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी दौरा आयोजित करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच, धाराशिव स्थानकावर कोच इंडिकेटर, एटीएम, लॉकर, स्वतंत्र महिला प्रतीक्षालय आणि अतिरिक्त बुकींग क्लार्कची गरज व्यक्त करण्यात आली.
नवीन रेल्वेमार्ग व दुहेरीकरणाच्या संदर्भातही अनेक मागण्या मांडण्यात आल्या. धाराशिव – बीड – संभाजीनगर मार्गासाठी पुन्हा सर्वेक्षण करून काम त्वरित सुरू करावे, धाराशिव – तुळजापूर – सोलापूर मार्ग २०२७ पर्यंत पूर्ण करण्यावर भर द्यावा, लातूर रोड – कुर्डुवाडी मार्गाच्या दुहेरीकरणाबाबत स्पष्टता यावी, अशा मागण्या खासदारांनी मांडल्या. तसेच, नांदेड – लातूर रोड आणि पंढरपूर – शेगाव दरम्यान नव्या रेल्वेमार्गास गती देण्याचे आवाहन करण्यात आले.
स्थानकांच्या सुविधांसंदर्भात वडगाव (ता. धाराशिव) येथे नवीन स्थानक, नांदेड जंक्शनला मध्य रेल्वेखाली आणणे, दडशिंगे रोड येथे क्रॉसिंग, ढोकी येथे ओव्हरब्रिज, तसेच शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी आरक्षणासारख्या मागण्या झाल्या. बार्शी तालुक्यातील ग्राम पुरी आणि धाराशिवच्या जहागीरदारवाडी येथील अंडरब्रिजमधील पायाभूत समस्यांवरही उपाय सुचवण्यात आले.
रेल्वे थांब्यांबाबत हरंगुळ-हडपसर मार्ग पूर्ववत सुरू ठेवण्यासह एल.टी.टी. मुंबई – नांदेड गाडीला धाराशिव व बार्शी, लातूर – मुंबई गाडीला कळंब रोड, आणि नांदेड – पनवेल गाडीला ढोकी येथे थांबा देण्याच्या मागण्या झाल्या.
या बैठकीत सादर करण्यात आलेल्या मागण्या संबंधित विभागाकडे पाठवून त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.