
१९ जुलै रोजी जिल्हयात होणार १५ लक्ष वृक्ष लागवड
जिल्हावासियांना जागतिक विक्रम करण्याची संधी उपलब्ध
धाराशिव – जिल्ह्यामध्ये वृक्षांचे प्रमाण वाढावे, जिल्हा वृक्षांनी आच्छादित व्हावा व त्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.येत्या १९ जुलै रोजी जिल्ह्यातील २९४ ठिकाणच्या ५ हजार ७०२ आर क्षेत्रावर १५ लक्ष विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार असून प्रत्येकांनी ते झाड आपले आहे या भावनेने कुटुंबासह येऊन सहभागी होत वृक्षारोपण करावे.तसेच रोपण केलेल्या वृक्षासोबत आपल्या आईसह कुटुंबासमवेत सेल्फी काढणे आवश्यक आहे.लावलेले वृक्ष ही सरकारी मोहीम न समजता स्वतःच आपल्या व भावी पिढीच्या फायद्यासाठी त्याची कशी जपवणूक होईल याची काळजी घ्यावी.त्यासाठी हरित धाराशिव महोत्सव म्हणजेच वृक्ष लागवड हा सृष्टीचा सोहळा साजरा करावा,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागातून हरित धाराशिव अभियान,एक पेड मॉ के नाम, संकल्प वृक्षरोपणाचा… एका दिवसात १५ लक्ष वृक्षांचा या अंतर्गत हरित धाराशिव अभियान संदर्भात आढावा बैठकीचे आज आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी जिल्हाधिकारी पुजार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष,उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रवीण धरमकर,विभागीय वन अधिकारी बी.एस.पोळ,सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी व्ही.के.करे,उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. पुजार म्हणाले की,पालकमंत्री, खासदार,आमदार,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष,उपाध्यक्ष,पंचायत समितीचे सभापती,सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते व त्यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करावी असे आवाहन त्यांनी केले.तर ज्या ठिकाणी वृक्षांची लागवड करायची आहे,त्या क्षेत्रावर व्यवस्थितरित्या खड्ड्यांची आखणी करून त्याची खोली लांबी रुंदी व्यवस्थितपणे घेणे आवश्यक आहे. तसेच लागवडीच्या तीन-चार दिवस अगोदर सर्व रोपे नेऊन ठेवावीत. विशेष म्हणजे मागील काही दिवसापासून पावसाने उघडीत दिल्यामुळे रोपांच्या पिशवीमध्ये भेगा पडलेल्या आहेत.त्यामुळे वृक्ष लागवड करताना रोप पिशवीसह बकेटमध्ये बुडवून बुडबुडे बाहेर येईपर्यंत त्यास पाणी द्यावे.त्यामुळे पुढील दहा पंधरा दिवस पाऊस पडण्यास विलंब झाला तरी ती रोपे टवटवीत राहू शकतात असे त्यांनी सांगितले.
खड्ड्यामध्ये कंपोस्ट खत नसेल तर मळी किंवा बग्यास वापरावा असे सांगून श्री.पुजार म्हणाले की,वृक्ष लागवडीमध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी ग्रामसेवक,तलाठी, कृषी सहाय्यक व तालुका कृषी अधिकारी यांनी गावकऱ्यासमवेत बैठक घ्यावी.बैठक घेतल्यास गावकऱ्यांना देखील प्रेरणा मिळून ते देखील आपोआप सहभागी होतील व त्यांच्या सहकार्यानेच वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण होईल असा विश्वास श्री.पुजार यांनी व्यक्त केला. तर ज्या ठिकाणी कुंपण किंवा भिंत नाही अशा ठिकाणी चार बाय चार आकाराचा दोन मीटर लांबीचा चर खोदून घ्यावा असे त्यांनी सांगितले.
वृक्षांना क्यु आर कोड बसविण्यात येणार असून ही वृक्ष लागवड सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सर्वांना दिसणार आहे.१० आर क्षेत्रासाठी १० वृक्ष मित्र आवश्यक असून क्षेत्राप्रमाणे त्याची संख्या वाढणार असल्याचे श्री. पुजार यांनी सांगितले.या बैठकीला सर्व तहसिलदार,गट विकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनजागृतीसाठी शालेय स्तरावर लेझीम,गीत व इतर कार्यक्रम तर जिल्हास्तरावर गोंधळी गीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तर वृक्ष लागवड स्थळी मंडप उभारुन सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचे श्री.पुजार यांनी सांगितले.