नूतनीकृत वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलचा गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी शुभारंभ

Spread the love

सोलापूर : १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी रेल्वे लाईन्स भागातील नूतनीकृत वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल येथील ओपीडी विभाग ,वातानुकूलीत औषधालय, २० खाटांचे वॉर्डस, पॅथॉलॉजी लॅब, सी टी स्कॅन आणि कॅन्टीन असे विविध विभाग सुरू करीत असल्याची माहिती संस्थेचे मानद सचिव शिरीष गोडबोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ओपीडीची इमारत अद्यावत व देखणी झाली असून त्यात मेडिसीन ,सर्जरी, प्रसूती व स्त्री रोग, हृदयरोग, दंतचिकित्सा , नेत्रचिकित्सा , त्वचा रोग , मेंदू विकार यासाठीच्या विविध तज्ञ डॉक्टरांच्या वातानुकूलित कन्सल्टिंग रूम्स आहेत. या इमारतीचे उद्घाटन बालाजी अमाईन्सचे चेअरमन श्री, ए. प्रताप रेड्डी यांच्या शुभहस्ते करण्यात येईल.
ओपीडीच्या समोरच्या बाजूला वातानुकूलित औषधालय असून योग्य दरात औषधे उपलब्ध होतील. या औषधालयाचे उद्घाटन श्री. रंगनाथजी बंग यांच्या शुभ हस्ते तर २० खाटांच्या इनडोअर युनिटचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळी पुणे चे व्यवस्थापन समिती सदस्य सीए राजेश पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
ह्याप्रसंगी स्व. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या प्रेरणेतून साकार झालेल्या सीटी स्कॅन विभागाचे उद्घाटन त्यांच्या पत्नी डॉ. उमा वळसंगकर यांच्या हस्ते , पॅथॅलॉजी विभागाचे उद्घाटन डॉ . राजीव वैशंपायन व वैशंपायन कुटुंबियांच्या शुभहस्ते होणार आहे. हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची सोयी करिता उपहारगृहाचे उद्घाटन हॉस्पिटलच्या आधीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात येईल.
या हॉस्पिटल साठी काही ज्येष्ठ अनुभवी प्रतिथयश तज्ञ डॉक्टर्स, गरजू रुग्णांसाठी, दर बुधवारी ९ ते १ यावेळेत विनामूल्य तपासणी करणार आहेत. ही सेवा अमूल्य सेवा योजना अशी असेल. त्याच प्रमाणे स्वयंसेवी ज्येष्ठ नागरिक रोज आपला वेळ रुग्णांच्या मदतीसाठी देणार असून या अभिनव योजनेला सेवाव्रती योजना असे म्हटले आहे. अशा प्रकारची विशेष सेवा देणारी ही सोलापुरातील पहिलीच संस्था असल्याचे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ . ज्ञानेश्वर सोडल ह्यांनी सांगितले.
लवकरच एन् टी पी सी च्या माध्यमातून आकारात येणाऱ्या इमारतीमध्ये १०० खाटांचे अद्ययावत विभाग व भविष्यामध्ये २५० असे एकूण ३५० खाटांचे भव्य रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज सुरु करण्याचा संकल्पित मानस आहे असे डॉ सुनील घाटे म्हणाले.

रुग्णालयाच्या उभारणीबरोबरच शि. प्र. मंडळी , पुणे आणि वाडिया हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जीएनएम नर्सिंग स्कुलची सुरुवात होणार आहे.
हॉस्पिटलच्या या कार्यामध्ये अनेक संस्थांपैकी एनटीपीसी , बालाजी अमाईन्स ग्रुप , शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे , बंग डाटा फॉर्म्स, इंडोकाउन्ट लि., अल्ट्राटेक कंपनी आणि यासह इतर व्यक्ती आणि प्रतिष्ठान यांच्या आर्थिक योगदानाचा समावेश आहे. निधी उभारणी कार्याची सुरुवात हॉस्पिटलच्या विद्यमान गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांनी वैयक्तीक सहभागाने केली आहे हे विशेष होय.
इतिहास
एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल हे १९३४ मध्ये सुरू झालं आणि १९४९ मध्ये याचा ट्रस्ट होऊन अधिकृत घटना तयार झाली. सुरुवातीला वाडिया कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीतून इमारत बांधून झाली आणि त्यामुळे या ट्रस्टला एन. एम. वाडिया चॅरिटेबल ट्रस्ट असं नाव देण्यात आलं. हॉस्पिटल चे पहिले अध्यक्ष कै . डॉ. विष्णु गणेश वैशंपायन यांच्या अथक परिश्रमातून मेडिकल कॉलेज ची उभारणी झाली आणि मरणोत्तर त्यांचे नांव कॉलेजला देण्यात आले. आणि १९७४ साली ते कॉलेज महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्यात आलं, तरीही हे हॉस्पिटल या वैद्यकीय महाविद्यालायला संलग्न होतं .
या हॉस्पिटलचा इतिहास पाहिला तर १९३२ मध्ये डॉक्टर वैशंपायन हे बॉम्बे लजिस्स्लेटिव कौन्सिलचे मेंबर होते. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करून, मिळून सोलापूर मध्ये हॉस्पिटल चालू करायचे ठरवले. सुरुवातीला दाट वस्ती असलेल्या परिसरात त्यांनी दवाखाना चालू केला . या दवाखान्या मध्ये इतके रुग्ण येत की त्यांना हॉस्पिटल असावं अशी गरज भासू लागली आणि म्हणून सुरुवातीला चौदाशे रुपये इमारत निधी गोळा करून हॉस्पिटल सुरू करायचे निश्चित झाले .
ही संस्था सुरवातीपासूनच अतिशय निस्वार्थ आणि तन मन धनाने काम करणारी अश्या व्यक्तींमुळे आहे. डॉ. वैशंपायन यांच्या प्रयत्नाने १९३३ मध्ये हॉस्पिटलची कोनशीला बसवण्यात आली आणि १९३४ मध्ये १४ ऑगस्टला २४ बेड्स चं हॉस्पिटल तयार झालं. पण प्रत्यक्ष काम मात्र १४ ऑक्टोबर १९३४ ला सुरू झालं. कै . हिराचंद नेमचंद दोशी, किसनलाल गुलाबचंद देवडा ,मेघराज गुलेच्छा , सोलापूर

नगरपालिका ,केंद्रीय आरोग्य विभाग आणि अशाच अनेक दानशूर देणगीदारांच्या प्रयत्नातून या हॉस्पिटलची वाढ झाली. हे हॉस्पिटल सोलापूर शहराच्या मध्यवर्ती असून सुमारे ४ एकर एवढ्या जागेवर वसलेले आहे. फार पूर्वी सुद्धा इथे गॅमा कॅमेरा, सिटी स्कॅन, एम् . आऱ् . आय . सुविधा उपलब्ध होत्या .सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेल्वे स्टेशन पासून अगदी चालत येण्यासारख्या अंतरावर हे हॉस्पिटल असून इथे आजूबाजूच्या दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटका , तेलंगणा इथून लोक उपचारासाठी यायचे आणि आताही त्यांची इथे चांगली सोय होईल याची खात्री असल्याचा विश्वास गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्यांनी व्यक्त केला. हॉस्पिटलच्या विकासासाठी समाजातील सर्वांच्या सहकार्याचे आवाहन केले.

या पत्रकार परिषदेस गव्हर्निंग काऊन्सिल सदस्य डॉ सुनील घाटे, डॉ . संदीप भागवत, राम रेड्डी,संजय पी. पटेल, ॲड. नितीन हबीब, सीए श्रीधर रिसबूड , डॉ. राजेंद्र घुली , डॉ. विजय सावस्कर , डॉ. सुनील मेहता, डॉ . शिरीष कुमठेकर, वासुदेव बंग, हेमंत चौधरी , कल्पेश जव्हेरी, गिरीश भुतडा उपस्थित होते, संस्थेचे अध्यक्ष म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी प्रभाकर करंदीकर तर उपाध्यक्ष म्हणून उद्योगपती प्रेमरतन दमाणी कार्यरत आहे. शिवाय आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, पुण्याचे डॉ. आनंद भागवत व डॉ. अनिल बर्वे यांचा समावेश आहे.

  • Related Posts

    माजी मंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती खालावली; पुण्यात ICU मध्ये उपचार सुरू

    Spread the love

    Spread the loveपुणे – महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराच्या तीव्र त्रासामुळे शनिवारी सायंकाळी त्यांना…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *