
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या ३४ हजार कर्मचार्यांना दोन महिने पगार नाही! केंद्र सरकारने ८०० कोटी थकवले.
मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात काम करणाऱ्या तब्बल ३४ हजार कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या हिश्शापोटीचे आठशे कोटी रुपये न मिळाल्यामुळे कर्मचार्यांना पगार देता येत नसल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले
दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून एनएचमच्या कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राज्यात एनएचएमअंतर्गत विविध योजनांतर्गत डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, डाटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक, प्रयोगशाळा तज्ज्ञ अशा विविध पदांवर हजारो कर्मचारी काम करत आहेत. त्यांना राज्य सरकारमार्फत मानधन दिलं जातं. मात्र दोन महिन्यांपासून हे मानधन मिळालेलं नाही. आरोग्य विभागात दोन सचिव, आरोग्य आयुक्त तसेच अनेक बाबू मंडळी असूनही केंद्राकडून जो निधी मिळणे अपेक्षित आहे तो वेळेवर का मिळत नाही, असा सवाल डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असेल तर अडचणी येत नाहीत, असे वारंवार युतीच्या नेत्यांनी सांगितले. आरोग्य विभागाला मात्र उलट अनुभवाचा सामना करावा लागत आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजनांची शहरात, तसेच ग्रामीण भागात अमलबजावणी करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेतनही वेळवर मिळणार नसले तर याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही डॉक्टरांकडून उपस्थित केला जात आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर व केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रताप जाधव हे एकाच पक्षाचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत.शिवाय राज्यात समन्वय असावा म्हणून केंद्रीय आरोग्यमंत्री जाधव यांनी आरोग्य विभागाची राज्य रक्त संक्रमण परिषदेतील जागा ताब्यात घेऊन तेथे आपले कार्यालय थाटले आहे. तरीही एनएचएम तसेच केंद्राकडून मिळणारा आरोग्याचा निधी वेळेवर का मिळत नाही,असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.