गुणात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Spread the love

देशातील गतिमान आरोग्य सेवेची जागतिक स्तरावर दखल- केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा.

शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम किरणोपचार प्रणालीचे लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर – सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समन्वयातून आरोग्य सेवेतील त्रिस्तरीय यंत्रणा पुढील तीन ते चार वर्षात उभी करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला गुणात्मक आरोग्य सेवा त्याच्या घरापासून तीन ते पाच किलोमीटर परिसरात उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. दरम्यान देशात मोठ्या प्रमाणावर उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत असून चालू वर्षात कर्करोगावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. ज्यामुळे लवकर निदान करण्यासोबतच निदान झाल्यावर 90 टक्के रुग्णांवर 30 दिवसात उपचार सुरू करण्यात आले आहेत. याची नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी सांगितले.

शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे व कर्करोग संस्थेच्या विस्तारीत भागाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय आरोग्य,कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, खा. सांदिपान भुमरे, आ. सतिष चव्हाण, आ.संजय केणेकर, आ. नारायण कुचे, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजना जाधव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकिय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, राज्य कर्करोग संस्थेचे सल्लागार डॉ.कैलास शर्मा, राज्य कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, संचालक डॉ. अजय चंदनवाले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजीनगर येथे ट्रू बीम सारखी कर्करोगावरील उपचारासाठी अद्यावत सुविधा उपलब्ध होत आहे, याचे समाधान आहे. राज्यात शासकीय आरोग्य व्यवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथे पहिल्यांदा ही अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध होत आहे. जीवन पद्धतीत झालेल्या बदलांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. कर्करोगावरील उपचारासाठी रेडिएशन, कीमोथेरेपी यासारखी पद्धती वापरली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. ट्रु बीम सारख्या अद्यावत यंत्रामुळे ज्या भागात संक्रमण आहे, त्याच भागात नेमकेपणाने रेडिएशनद्वारे उपचार करणे शक्य झाले आहे. या उपचारासाठी राज्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे जावे लागत होते, देशभरातून तिथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने टाटा मेमोरियल हॉस्पिटलवर मोठा भार आहे. मात्र आता छत्रपती संभाजीनगर येथे ही सेवा उपलब्ध झाली असून मराठवाड्यातील तसेच लगतच्या जिल्ह्यातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी ही सुविधा वरदान ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगर येथे अद्ययावत कर्करोग सुविधा उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासनाकडून सहाय्य मिळावे, यासाठी २०१६ मध्ये येथील कर्करोग रुग्णालयाला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आवश्यक कार्यवाही करून आज अद्ययावत उपचार सुविधा उपलब्ध झाली असल्याचे सांगून श्री.फडणवीस म्हणाले, कर्करोगावरील संपूर्ण उपचार रुग्णांना मिळावेत, यासाठी पेट सिटी स्कॅनरलाही मंजुरी देण्यात आली आहे. हे उपकरण कार्यान्वित झाल्यानंतर कर्करोग रुग्णांवरील उपचारासाठी आणखी चांगली सुविधा मिळू शकेल. कर्करोग बरा होण्यासाठी लवकर निदान महत्वाचे असते, मात्र अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे राज्य शासनाच्या सर्व वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थांमध्ये याबाबतची तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. यासोबतच कर्करोग होवूच नये, यासाठीही जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.फडणवीस म्हणाले, राज्यात गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये जवळपास दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांसाठी जवळपास पाच हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय हे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुपांतरीत झाले आहेत, अशा जिल्ह्यात स्वतंत्र सामान्य रुग्णालय उभारण्याचा निर्णयही घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील गतिमान आरोग्य सेवेची जागतिक स्तरावर दखल_केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा म्हणाले, देशात मोठ्या प्रमाणावर उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत असून चालू वर्षात कर्करोगावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. ज्यामुळे लवकर निदान करण्यासोबतच निदान झाल्यावर 90 टक्के रुग्णांवर 30 दिवसात उपचार सुरू करण्यात आले आहे. याची नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे.

2019 मध्ये ज्या जागेवर मी भूमीपुजन केले त्याच जागेवर आज भव्य आणि अद्ययावत रुग्णालय उभे राहिले व माझ्या हस्ते उद्घाटन झाले याचा विशेष आनंद असल्याचे नमूद करून ते पुढे म्हणाले, आरोग्य सुविधेबाबत केंद्र शासन सर्वंकष धोरण राबवित असून यामध्ये लवकर निदान, उपचार यासोबतच प्रतिबंध या तीन सुत्रांवर काम सुरू आहे. कर्करोग ही प्राधान्याची बाब ठरवून चालू वर्षात 200 डे केअर सेंटर्स उभारली जाणार आहेत. तसेच आरोग्य सुविधेचा घटक असणाऱ्या नर्सिंगबाबतही धोरण ठरविले असून देशात नवीन 100 नर्सिंग महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत अशी माहितीही श्री.नड्डा यांनी दिली.

टु बीम व्यवस्थेमुळे अधिक चांगल्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. कर्करोग झालेल्या रुग्णाचे संपूर्ण घर त्याच्या धसक्याने खचून जाते. अशा सर्वाना यातून खंबीर आधार देता येणार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जात आहेत. 780 वैद्यकीय महाविद्यालये आज देशात आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. उपचारासाठी यंत्रणा उभारताना प्रतिबंधावर शासनाचा अधिक भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशात 1 लाख 75 हजार आयुष्यमान आरोग्य मंदिर स्थापन केले आहेत. या सुविधेतून कर्करोगाचे निदान करण्यासाठी स्क्रिनिंग करण्यात येते. स्क्रिनिंगची क्षमता वाढविण्यात आली असून कर्करोगाचे वेळेत निदान होणे शक्य झाले आहे. यातून तोंडाचा कर्करोग, महिलांचा स्तनाचा कर्करोग याचे वेळेत निदान झाल्याने वेळेत उपचाराही सुरू झाले आहेत. देशातील आरोग्य व्यवस्थेत अनेक बदल करण्यात येत आहेत. येत्या काळात देशातील आरोग्य व्यवस्था अधिकाधिक बळकट करण्यासाठी भरीव निधीची देखील तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सुविधा, वैद्यकीय शिक्षण यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही असे त्यांनी सांगितले.

15 व्या वित्त आयोगात 7 हजार कोटी रुपयांची तरतूद आरोग्यासाठी करण्यात आल्याचे सांगून श्री.नड्डा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आरोग्य विमा योजनेच्या माध्यमातून देशातील 60 कोटी ज्येष्ठ नागरिकांना 5 लाखापर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. देशातील विमा योजनेला राज्याने जोड दिली असून आतापर्यंत 10 नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू होत आहेत. त्यात आणखी एकाची भर घालण्यात येत असून अतिरिक्त 700 वैद्यकीय जागा महाविद्यालयात देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

मराठवाड्यातील कर्करोग रुग्णांसाठी वरदान-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ म्हणाले, राज्य कर्करोग संस्थेच्या इतिहासात आजचा हा दिवस महत्वाचा आहे. कर्करोग रुग्णांसाठी 2012 मध्ये 100 बेडवर सुरू झालेला कर्करोग रुग्णालयाचा 300 बेडपर्यंत विस्तार झाला आहे. राज्यात जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून तसेच इतर योजनांच्या मदतीने गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्यात येत आहे. कर्करोग रुग्णालयात लवकरच पेट स्कॅन सुविधा देण्यात येणार आहे. मराठवाड्यातील कर्करोग रुग्णांसाठी या सुविधा निश्चितपणे वरदान ठरतील. या संस्थेला एम्सचा दर्जा देण्याची विनंती त्यांनी केली.

राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दर्जेदार शिक्षण त्याचबरोबर चांगल्या सुविधा देण्यावर शासनाचा भर आहे. शासकीय रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात दररोज तीन ते चार हजार रुग्ण येतात. त्यांना दर्जेदार सेवा देणे शासनाचे कर्तव्य आहे. येत्या दोन वर्षात जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व उपचार सुविधा देण्यात येणार आहेत. जेणेकरुन खाजगी रुग्णालयात रुग्णांना जाण्याची गरज पडणार नाही. अशी व्यवस्था उभारण्यासाठी राज्य शासनाकडून काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्करोग संस्थेचे सल्लागार डॉ.कैलास शर्मा यांनी कर्करोग व उपचार व्यवस्थेबाबत माहिती दिली. यावेळी भारतीय बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वैद्यकीय प्रयोगशाळेबाबतचे विधेयक संमत केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


  • Related Posts

    राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन न झाल्याने बेमुदत कामबंद अंदोलन

    Spread the love

    Spread the loveजिल्हाधिकारी अधिकारी यांना निवेदन धाराशिव : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन न झाल्याने बेमुदत कामबंद अंदोलन , जिल्हाधिकारी यांना महासंघाच्या वतीने…

    धाराशिव सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या निधीचा प्रश्न मार्गी

    Spread the love

    Spread the loveमुख्यमंत्री फडणविस यांचे विशेष बाब म्हणून आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून निधी देण्याचे निर्देश धाराशिव येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासोबतच ५०० खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय मंजूर केले होते.परंतु त्यासाठी निधी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *