अकोला -: विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मुर्तीजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्व. तुकाराम बिडकर हे विविध क्षेत्रांचे जाणकार व विकासासाठी कार्यशील नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने मोठी हानी झाल्याची भावना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी माजी आमदार स्व. तुकाराम बिडकर यांच्या अकोला येथील रामनगर परिसरातील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली व सांत्वन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, आमदार किरण सरनाईक, आमदार विक्रम काळे, आमदार अमोल मिटकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्व. बिडकर यांचे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात मोठे कार्य आहे. ते अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, लोकांच्या सुखदुःखाशी समरस होणारे सच्चे लोकनेते होते. ते सामाजिक प्रश्नांची जाण असलेले व विकासासाठी कार्यशील नेतृत्व होते. राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराला त्यांची उणीव नेहमी जाणवेल अशी शोक भावना श्री पवार यांनी व्यक्त केली.