धाराशिव – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा बागांची विविध योजनेतून लागवड करण्यात आली आहे.निर्यातक्षम दर्जाच्या आंबा उत्पादनासाठी मँगोनेट या ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी सुरू आहे.या नोंदणीसाठी १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
जागतिक व स्थानिक बाजारपेठेत किडकनाशक अवशेषांविषयी जागरूकता वाढली असल्याने, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च दर्जाचे उत्पादन घ्यावे.जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून आंबा बागांची नोंदणी करण्यात येत आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला असून,आतापर्यंत ११३४ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत व त्यांची मँगोनेट प्रणालीवर नोंदणी पूर्ण झाली आहे.सन २०२० या वर्षी १४.४२ क्षेत्र हेक्टर क्षेत्रासाठी ७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. २०२१ यावर्षात ४०.५६ हेक्टर क्षेत्रासाठी ३६ शेतकऱ्यांनी,सन २०२२ यावर्षात १७.३८ हेक्टर क्षेत्रासाठी १६ शेतकऱ्यांनी,२०२३ यावर्षात ४९.८२ हेक्टर क्षेत्रासाठी ५६ शेतकऱ्यांनी,२०२४ यावर्षात १०९५.०० हेक्टर क्षेत्रासाठी ११३४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या पाच वर्षांत झालेली ही सर्वात मोठी नोंदणी असून,जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी अधिक्षकांनी केले आहे.