
बार्शी शहरातील महाराष्ट्र बँकेशेजारी रक्त-लघवी तपासणी लॅबमध्ये गणेश अंकुश नाईकवाडी (वय 25, रा. पानगाव, ता. बार्शी) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.
गणेश नाईकवाडी याने नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. आज संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नाईकवाडी यांचे मेहुणे गणेश गाडे यांनी गणेशच्या नातेवाईकांना फोनद्वारे या दुर्दैवी घटनेची माहिती दिली. त्यानंतर गणेशचे काका लहू मारुती नाईकवाडी (वय 52, धंदा-शेती, रा. पानगाव) व गणेशचे आई-वडील तसेच इतर नातेवाईक बार्शी ग्रामीण रुग्णालयात पोहोचले.
घटनेची माहिती मिळताच बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत आत्महत्येमागील कारण अस्पष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.