
अभिनेत्री प्राजक्ता माळीने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांचे विशेषतः डिजिटल माध्यमे आणि युट्यूबवरील बेसुमार चॅनेलचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. हे कधी ना कधी होणार होतेच. वाट्टेल ते बोलायचे… वाट्टेल ते बरळणाऱ्यांना बुद्धी गहाण ठेवून प्रसिद्धी द्यायची… फक्त प्रसिद्धीसाठी वाट्टेल तसे वागणाऱ्यांचा उदो उदो करायचा… हे गेल्या काही वर्षापासून चालूच राहिल्यामुळे डिजिटल माध्यमांवर आज ही वेळ आली. या सगळ्याला काही माध्यमे निश्चितपणे अपवाद आहेत. तरीही फालतू बडबड करणाऱ्यांचा आणि काहीही दाखवणाऱ्यांचा आकार इतका मोठा झाला आहे की त्यामुळे शांतपणे विचार करायला लावणारा आशय लोकांपर्यंत पोहोचूच शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
आज पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळीने जी उदाहरणे दिली ती या क्षेत्रातील दिग्गज अनुभव असलेले तज्ज्ञ संदीप अमर सरांनी २०१९ मध्ये डिजिटल मीडियातील पहिले व्याख्यान पुण्यात आयोजित केले होते, त्यावेळीच दिली होती. त्याचा व्हिडिओ याच वॉलवर उपलब्ध आहे. हे सगळे खूप आधीपासून सुरू आहे. फक्त आता ते काहींचे करिअर बर्बाद करण्यापर्यंत जाऊन पोहोचले आहे. प्राजक्ता माळीचे उदाहरण हे त्यापैकीच एक.
माध्यमांमधील या सगळ्या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती प्राजक्ता माळीने केली आहे. तसे काही होईल, असे तूर्त तरी वाटत नाही. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नावाखाली सुरू असलेला हा सगळा प्रकार सहजासहजी रोखणे हे त्यांच्यासाठीही अवघडच आहे. पण तरीही डिजिटल माध्यमांसंदर्भात ठोस धोरण आखून त्याला एका चौकटीत आणले गेलेच पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मी याच वॉलवरील पोस्टमधून हेच सांगतो आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने हे गांभीर्याने घेतले पाहिजे.
लोकशाही व्यवस्थेमध्ये माध्यमे असलीच पाहिजेत. त्यांचा आवाजही जाणवलाच पाहिजे. पण माध्यमे किती असली पाहिजे, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. फुकटचे युट्यूब वापरून उठसूठ प्रत्येकजण चॅनेल काढत बसला तर परिस्थिती आणखी अवघडच होत जाणार. आपल्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढविण्यासाठी वाट्टेल ते देण्याचे आणि वाट्टेल तसे विश्लेषण करण्याचे पीकच आले आहे. वाट्टेल तसे व्हिडिओ… त्यातून व्ह्यूज… त्यातून वॉचटाईम… त्यातून पैसे… पैशातून पुन्हा आणखी वाट्टेल तसे व्हिडिओ… त्यातून नवे सबस्क्राईबर्स… त्यातून राजकीय पक्षांकडून पॅकेज… पॅकेजमधून पुन्हा वाट्टेल ते व्हिडिओ… असे दुष्टचक्र सध्या डिजिटल माध्यमात सुरू आहे, हे भीषण सत्य स्वीकारले पाहिजे. या सगळ्यामुळे अनेक जुन्या आणि अभ्यासू माध्यमांबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहू लागले आहे.
प्राजक्ता माळीने माध्यमांबद्दल आज जे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर शांतपणे विचार केला पाहिजे. आज जर यावर विचार केला नाही, तर उद्या सामान्य युजर्स माध्यमांची खरंच गरज आहे का?, याचा विचार करतील. काहींनी तर या सगळ्या माध्यमांपासून दूर राहायला सुरुवात केलेली सुद्धा आहे.