
पुणे – महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराच्या तीव्र त्रासामुळे शनिवारी सायंकाळी त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.
सावंत यांना छातीत तीव्र वेदना होत असल्याने वैद्यकीय पथकाने त्यांना तात्काळ अतिदक्षता विभागात (ICU) हलवले. सध्या त्यांच्यावर अत्यावश्यक औषधोपचार सुरू असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
रूबी हॉल क्लिनिकमधील वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (२९ जून) तानाजी सावंत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत नातेवाईक आणि समर्थकांमध्ये काळजीचं वातावरण आहे.
तानाजी सावंत हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असून, त्यांनी राज्यातील आरोग्य खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे.