
धाराशिव -: अंतर्गत राजकीय कलह, दबावाचे वातावरण आणि प्रशासनातील विविध अडथळे… अशा खडतर परिस्थितीतही धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या वसुधा फड यांनी दोन वर्षांचा कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण केला असल्याने त्यांच्या बदलीचे आदेश नगरविकास विभागाच्या वतीने नुकतेच जारी झाले असून, हा कार्यकाल प्रशासनिक दृष्टिकोनातून एक आदर्श ठरल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमधील अंतर्गत मतभेद व कुरघोडीच्या पार्श्वभूमीवर, नगरपालिकेचा कारभार सुरळीत ठेवणे हीच मोठी जबाबदारी होती. अनेक वेळा राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासनावर होणाऱ्या दबावांमुळे निर्णयप्रक्रिया अडथळ्यांत सापडत होती. मात्र, मुख्याधिकारी फड यांनी शांत, संयमी आणि न्याय्य प्रशासनाची भूमिका निभावत कार्याचा वेग कायम ठेवला.
शहरातील नागरी सुविधांची उन्नती, स्वच्छता मोहिमा, रस्ते विकास, पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी तसेच गुत्तेदारांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवणे — हे सर्व त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. कठीण काळातही नागरिकांशी समन्वय राखत, विकासाच्या दृष्टीने दूरदृष्टी ठेऊन निर्णय घेणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य ठरले असल्याचे सांगितले जाते.
वसुधा फड यांच्या या कार्यपद्धतीचे कौतुक केवळ प्रशासनापुरते मर्यादित राहिले नाही, तर नागरिक, कर्मचारीवर्ग व काही प्रगल्भ राजकीय नेत्यांनीही त्यांच्या पारदर्शक व कणखर कारभाराला दुजोरा दिला. त्यांनी कुठलाही राजकीय दबाव न स्वीकारता ‘काम आणि परिणाम’ या तत्वावर आधारित प्रशासन देण्याचा प्रयत्न केला असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
त्यांच्या बदलीचे आदेश आले असून, सध्या त्यांना पुढील आदेश येईपर्यंत ‘होल्डर’ म्हणून ठेवण्यात आले आहे. नव्या ठिकाणी त्यांना लवकरच जबाबदारी दिली जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजले आहे.
धाराशिव शहराच्या प्रशासनात एक शिस्तबद्ध, सक्षम आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून वसुधा फड यांची ओळख कायम राहील, अशी नागरिकांनी भावना व्यक्त केल्या आहेत,तर त्यांचा कार्यकाळ हा पुढील अधिकाऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, यात शंका नसल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी आवर्जून बोलून दाखविले