
शिवसेना (ठाकरे) उपशहरप्रमुख प्रशांत (बापू) साळुंके यांचे तपास अधिकार्यांना निवेदन
धाराशिव – धाराशिव महावितरण कार्यालयातील प्रभारी कार्यकारी अभियंता नीलांबरी कुलकर्णी यांनी पदाचा दुरुपयोग करुन भ्रष्ट कारभार करत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या कारभाराची चौकशी करुन फसवणुकीचा गुन्हा नोंद करावा, त्यांच्या मालमत्तेची चौकशी करुन सेवेतून बडतर्फ करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (ठाकरे) शहरसंघटक प्रशांत (बापू) साळुंके यांनी निवेदनाद्वारे तपास अधिकार्यांना दिला आहे.
निवेदनात म्हटले की, धाराशिव कार्यालयाच्या प्रभारी कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांनी प्रभारी अधीक्षक अभियंता पदावर असताना त्याचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे रीतसर तक्रारी दिली असताना अद्याप कार्यवाही झालेली नाही असे नमूद करुन महावितरण सेवेत राहून केलेल्या भ्रष्टाचाराचा पाढा साळुंके यांनी निवेदनात मांडला आहे.
महावितरण धाराशिवअंतर्गत नादुरुस्त रोहित्रे दुरुस्ती साठी मे 2024 या महिन्यात ज्या एजन्सींना कोटी- दीड कोटी रुपयांची वर्कऑर्डर दिली, त्यांच्या वैध विद्युत ठेकेदार परवाना प्रमाणपत्राची तपासणी न करता बोगस गेट पासच्या आधारे बिले प्रमाणित केली आहेत, सबस्टेशन मेंटेनन्स कामासाठी महावितरण कार्यालयातून दहा ते बारा एजन्सी निवडल्या परंतु कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांनी अजिंठा इलेक्ट्रिकल आणि लिनिअर इंटरप्रायजेस या दोन एजन्सीला कोट्यावधी रुपयांची कामे दिली. इतर एजन्सीला कामे न देता त्यांच्याच भाऊबंदकीतील अजिंठा इलेक्ट्रिकल आणि लिनिअर इंटरप्रायजेस यांचेबरोबर अलिखीत पार्टनरशिप करून व वर्कऑर्डर मध्ये कमिशन घेऊन भ्रष्टाचार केला आहे. सबस्टेशन मेंटेनन्स कामासाठी महावितरणचे टेंडर निघाले होते, त्या टेंडरमध्ये कोणताही अनुभव नसणार्या एजन्सीला कुलकर्णी यांनी लाच घेऊन पात्र केले. तसेच मुख्य कार्यालयाने 31.03.2024 पर्यंत मंजुरी दिलेल्या एजन्सीला आज कोणताही वैध एलओए नसताना देखील लाच घेऊन सबस्टेशन स्कीम मधून कामे दिली आहेत. महावितरण धाराशिव विभाग येथे शासनाद्वारे सुमारे 14 कोटी निधी डीपीडीसीमधून दिला आहे. महावितरणच्या एकूण 40 एजन्सीला शासन निर्णयानुसार सगळ्या एजन्सीला समान प्रमाणात कामे देणे आवश्यक होते. प्रभारी अधीक्षक अभियंता कुलकर्णी यांनी यश इलेक्ट्रिकल यांचेसोबत कमिशन घेऊन यश इलेक्ट्रिकल या एकाच एजन्सीला सव्वा तीन कोटी रुपयांची कामे दिली. अधिकाराचा व पदाचा गैरवापर करून रितेश इलेक्ट्रिकल्स या एजन्सीसोबत त्यांनी अलिखीत भागीदारी केली आहे आणि रितेश इलेक्ट्रिकल्स या एजन्सीला सुमारे चार कोटी रुपयाचे काम दिले आहे. आणि एजन्सी सोबत अलिखीत भागीदारी करून 14 कोटी पैकी 7 कोटी रुपये निधी पचविण्यासाठी आपल्या सहीने पत्र काढून डिव्हिजनला पास होणारी बिले सर्कल ऑफिसला मागवून घेतली आहेत ते महावितरणच्या नियमबाह्य आहे. 7 कोटी निधीपैकी महावितरण नियमानुसार निधी सुशिक्षित बेरोजगार अभियंता योजनेनुसार 15-15 लाख रकमेच्या वर्कऑर्डर दिल्या आहेत, परंतु महावितरणच्या नियमानुसार या योजनेअंतर्गत प्रथम 10 लाख रुपयापर्यंतचे काम देऊन व त्या कामाची प्रगती, गुणवत्ता तपासून नंतर पुढील काम 15 लाख रुपयाचे देणे अपेक्षित आहे, परंतु त्यांनी प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार अभियंता कडून 25 हजार घेऊन त्यांना सुरुवातीलाच 15 लाख रुपयाची कामे दिली आहेत. अशा प्रकारे कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून शासनाचा व जनतेचा पैसा असणार्या डीपीडीसीच्या निधीतून झालेली कामे याची सखोल तपासणी करून निकृष्ट कामे मंजूर करणारे अधिकारी यांना निलंबित करावे व पदाचा व अधिकाराचा गैरवापर करणार्या प्रभारी अधीक्षक अभियंता कुलकर्णी यांची स्वतंत्र चौकशी करून व त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करावी. तत्कालीन अतिरिक्त कार्यकारी अभियंता नीलांबरी कुलकर्णी यांचे स्वतःचे शेतात कृषीपंप कनेक्शन असून त्यांचे ग्राहक धाराशिव शहर व तेर उपविभाग येथे आहे. कुलकर्णी यांनी स्वतःच्या कृषीपंप वीज कनेक्शनची बील दुरुस्ती करून कृषी थकबाकी कमी केली आहे.
कोणत्याही सर्वसामान्य ग्राहकाने कृषीपंप जोडणी चे बील चुकले असल्याची तक्रार दिली तरी कृषीपंप बील दुरुस्ती होत नाही असे सांगितले जाते. यानुसार चौकशी केली असता मागील पाच वर्षात धाराशिव जिल्ह्यात एकाही कृषीपंप बिलाची दुरुस्ती झालेली नाही परंतु धाराशिव जिल्ह्यातील एकमेव कुलकर्णी यांचे स्वतःचे शेतातील कृषीपंप बील दुरुस्ती अनधिकृतरीत्या करून थकबाकी निरंक केल्याचे व स्वार्थ साधून महावितरणची फसवणूक करुन मोठा भ्रष्टाचार केला आहे. शासनाच्या नियमानुसार महावितरण कंपनी ने शेतात कृषीपंप कनेक्शन असल्यास शासनाचे सोलार कनेक्शन मिळत नाही. परंतु तत्कालीन अतिरिक्त कार्यकारी अभियंता नीलांबरी कुलकर्णी यांचे स्वतःचे शेतात कृषीपंप कनेक्शन असून सुद्धा त्यांनी शासनाचे योजनेतून स्वतःच्या शेतात चार ते पाच सोलार कनेक्शन बसवून घेतले आहेत. यासाठी त्यांनी संबंधित अधिकार्यांवर दबाव टाकून आणि संबंधित सोलार एजन्सीला वेठीस धरून स्वतः च्या शेतात चार ते पाच सोलार शासनाच्या योजनेतून बसवून महावितरण व शासनाची फसवणूक केलेली आहे.
सर्वसामान्य शेतकर्यांच्या सोलार पंपच्या मागणीनुसार सहा सहा महिने थांबावे लागते मग लोकसेवक अधिकारी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून शासनाचे नियम धाब्यावर बसवून स्वतःच्या शेतात चार ते पाच सोलर बसवितो हा गुन्हा दृष्टीआड का केला जातो? या प्रकरणाची सखोल चौकशी करून आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करणार्या कुलकर्णी यांची स्वतंत्र चौकशी करून त्यांच्यावर शासकीय फसवणूकीचा गुन्हा नोंद करुन त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही साळुंके यांनी निवेदनात म्हटले आहे.