
शहापूर (ता. तुळजापूर) – महावितरणच्या निष्क्रियतेमुळे शहापूर येथे मुख्य ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. गेल्या आठ दिवसांपासून विजेअभावी पाणी पंप बंद असल्याने ऊस, ज्वारी, हरभरा, भुईमूग यांसारखी पिके वाळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
शेतकऱ्यांनी वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीही दखल घेत नसल्याचे समोर आले आहे. काही शेतकऱ्यांनी स्वखर्चाने नवीन डीपी बसवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना बंद अवस्थेतीलच डीपी परत दिला जात असल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर महावितरणच्या अधिकाऱ्यांना चिरीमिरी दिल्याशिवाय धाराशिव स्टोअरमधून डीपी मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शासनाच्या विविध योजनांतून वैयक्तिक पंपांसाठी डीपी मंजूर झाल्या असल्या तरी, त्यांचा प्रत्यक्ष उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दोन-तीन वेळा स्वतःच्या खर्चाने डीपी बदलणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.
संपर्कासाठी महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याने फोन उचलण्याची तसदी घेतली नाही, हे विशेष. परिणामी, गेल्या आठ दिवसांपासून शेतकऱ्यांच्या पिके होरपळून जात आहेत. तातडीने उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून, महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शेतकरी आंदोलनाचा इशारा देत आहेत. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून डीपीची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी शहापूर येथील शेतकऱ्यांकडून होत आहे.