धाराशिव – देशाला पहिल्या वैयक्तिक ऑलिम्पिक पदकाचा बहुमान मिळवून देणाऱ्या स्व.खाशाबा जाधव यांचा १५ जानेवारी हा जन्म दिवस आता ‘महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे.सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील खाशाबा जाधव यांनी सन १९५२ मध्ये हेलसिंकी येथील ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुस्तीत पहिले पदक पटकावले होते.हे भारताचे वैयक्तिक गटातील पहिले ऑलिम्पिक पदक ठरले.खाशाबा जाधव यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशाला हा मोठा बहुमान मिळाला.यामुळे १५ जानेवारी हा ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्म दिन आता राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जात आहे.
राज्य क्रीडा दिनानिमित्त क्रीडा स्पर्धांचे व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता श्री. तुळजाभवानी जिल्हा क्रीडांगण व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे खो-खो,बुध्दीबळ,फुटबॉल,तायक्वांदो,कराटे,स्केटींग या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
१५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता ग्रीनलॅन्ड स्कुल येथे ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान यावर व्याख्यान,विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांविषयी नियमावलीसह अन्य विषयीवर प्राथमिक माहिती देणारे मार्गदर्शन शिबीर,यशवंत खेळाडू, प्रशिक्षक तसेच क्रीडा शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती यांच्या उपस्थितीत नवोदित खेळाडू,विद्यार्थी यांच्यासाठी क्रीडा क्षेत्रातील करीअरबाबत परिसंवाद व चर्चासत्र तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव व पारितोषिकाचे वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास खेळाडू,क्रीडा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.