
नवी दिल्ली : अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या पॅरा खेळाडूंनी 3 सुवर्णांसह 1 रौप्य पदके जिंकून खेलो इंडिया पॅरा स्पर्धेतील अॅथलेटिक्सचे मैदान गाजवले. 100 मीटर शर्यतीत अकोलाच्या चैतन्य पाठकसह गोळाफेकीत कराडच्या साहिल सय्यद, पुण्याच्या सिध्दी क्षीरसागरने सुवर्ण यशाला गवसणी घातली. चैतन्य हा रिक्षा डायव्हरचा मुलगा असून बारावीच्या परिक्षेला दांडी मारून त्याने खेलो इंडिया स्पर्धेची पात्रता फेरीतही यश संपादन केले होते.
जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुरू असलेल्या दुसर्या पर्वातील खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत जय महाराष्ट्राचा सूर निनादला. अकोला शहरातील रिक्षा चालकाचा मुलगा असणार्या चैतन्य विजय पाठकने 100 मीटर धावणे टी 13 प्रकारात सुवर्ण धाव घेतली. 11. 59 सेकंदात शर्यत पुर्ण करीत चैतन्यने पदार्पणातच सुवर्णपदकाचा करिश्मा घडविला. 35 टक्के डोळ्याने अधू असलेल्या चैतन्यने महिन्याभरापूर्वीच राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण यश संपादून खेलो इंडिया स्पर्धेची पात्रता फेरी गाठली होती. या स्पर्धेमुळे बारावीच्या समाजशास्त्रच्या पेपरला दांडी मारून त्याने सुवर्ण यशाला गवसणी घातली होती. चैतन्यचे वडिल विजय पाठक हे अकोल्यात प्रवाशी रिक्षा चालवितात तर आई स्वच्छता कर्मचारी आहे. मातीवर सराव करणार्या चैतन्यने करून ट्रॅकवर आपली हुकुमत सिध्द केली. अकोल्यात रवि भटकर यांच्या मार्गदर्शनव्दारे तो कसून सराव करीत असतो.
क्रिकेटपटू ते गोळाफेकपटू असा प्रवास करणार्या कराडच्या साहिल सय्यदने एफ 64 गोळाफेकीत सुवर्णपदकाचा पल्ला पार केला. वैयक्तिक चौथ्या फेरीत 9.57 मीटरची सर्वात्तम फेकी करून कराडच्या साईलने सोनेरी यशाचे शिखर गाठले. 26 वर्षीय साईल व्हिलचेअर क्रिकेटमध्ये अनेकवर्ष रमला होता. दोन वर्षापासून त्याने गोळाफेक व थाळीफेक स्पर्धेकडे लक्ष दिले. पुण्यातील सणस मैदानात प्रशिक्षिका सोनिया शिंदे यांच्या मार्गदर्शनाव्दारे वर्षभरातच त्याने राष्ट्रीय स्पर्धेत पदकाची जादू घडविला. पाठोपाठ आता पर्दापणातच खेलो इंडिया स्पर्धेतही सुवर्ण यश संपादन केले.
गोळाफेकमध्ये महाराष्ट्राची सुवर्ण’सिद्धी’
अॅथलेटिक्समध्ये महिलांच्या गोळाफेक एफ 56 प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्णसह रौप्यपदक पटकावले. पुण्याची सिद्धी क्षीरसागर सुवर्णपदकाची मानकरी ठरली. हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने पुण्याच्या 20 वर्षीय सिद्धीने अंतिम फेरीत 5.88 मीटर गोळाफेक करीत अव्वल स्थान पटकावले. 5.63 मीटर गोळा फेकणारी महाराष्ट्राचीच मीनाक्षी जाधव रौप्यपदकाची मानकरी ठरली. तमिळनाडूच्या लिझी वेलू हिने (4.95 मीटर) कांस्यपदक मिळवले.
2016 मध्ये विषाणूजन्य आजारामुळे पाठीखालील भाग अधू झाल्यावरही हार न मानता सिद्धीने वडील विकास क्षीरसागर यांच्या पाठिंब्याच्या जोरावर आयुष्याशी दोन हात करण्याची जिगर दाखवली. यंदा फेब्रुवारीमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळवले. या आधारावर तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली.
सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद आहे. माझ्या या यशात प्रशिक्षक सोनिया शिंदे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. यंदा नवी दिल्लीत सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये होणार्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये मला देशासाठी पदक जिंकायचे आहे, अशी प्रतिक्रिया सिद्धीने व्यक्त केली.
वयाच्या 21 व्या वर्षी सूरपारंब्या खेळताना झाडावरून पडल्याचे निमित्त होऊन मीनाक्षीच्या पाठीच्या कण्याचे कायमचे नुकसान झाले. मात्र याचे दुःख मागे ठेऊन तिने खेळात स्वतःला झोकून दिले. तिने बास्केटबॉल आणि हँडबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. बालपणापासून मला अॅथलेटिक्सची आवड होती. मात्र परिस्थितीमुळे संधी मिळाली नाही. त्यामुळे गोळाफेकमध्ये मिळालेले हे रौप्यपदक माझ्यासाठी खास आहे, अशी प्रतिक्रिया मूळची फलटणची पण आता वाशीत स्थायिक असलेल्या 34 वर्षीय मीनाक्षीने व्यक्त केली. या वाटचालीत वाशी येथील कमला रहेजा (शरण) पॅराप्लेजिक सेंटरचे सर्वतोपरी सहकार्य लाभल्याचे मीनाक्षीने आवर्जून सांगितले.