
जिल्हा गुंतवणूक परिषद २०२५ यशस्वीरीत्या संपन्न
धाराशिव – जिल्ह्यातील उद्योगवाढीस चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात “एक खिडकी योजना” (Single Window Scheme) सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली.
आज धाराशिव येथे आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषद २०२५ चे उद्घाटन श्री. पुजार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,छत्रपती संभाजीनगरचे उद्योग सहसंचालक बी.टी.यशवंते,एमआयडीसी लातूरचे क्षेत्र अधिकारी श्री.खाडे,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय दास,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा धाराशिवचे व्यवस्थापक श्री.शेलार, मैत्री २.० च्या योगा देवधर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या परिषदेमध्ये जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर सखोल चर्चा झाली.
जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी सांगितले की,जिल्ह्यातील उद्योगांना विविध परवानग्या,मंजुरी प्रक्रिया आणि शासकीय सेवा सुलभ पद्धतीने मिळाव्यात,यासाठी ‘एक खिडकी योजना’ कार्यान्वित केली जाणार आहे.या योजनेअंतर्गत सर्व संबंधित विभागांची सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून,यामुळे उद्योग स्थापन करण्यासाठी लागणारा वेळ व किचकट प्रक्रिया कमी होईल.
जिल्हा गुंतवणूक परिषदेमध्ये उद्योगवाढीच्या संधी,उपलब्ध पायाभूत सुविधा,मनुष्यबळ,परिवहन व्यवस्था,औद्योगिक वसाहती आणि शासनाच्या विविध योजना यांचा आढावा घेण्यात आला.परिषदेमध्ये अनेक उद्योजकांनी आपल्या अडचणी मांडल्या आणि प्रशासनाकडून त्यावर सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.
जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी सांगितले की,“धाराशिव जिल्ह्यात नैसर्गिक संसाधने,मनुष्यबळ आणि औद्योगिक क्षमता मोठ्या प्रमाणात आहे.योग्य दिशादर्शन आणि सुविधा मिळाल्यास औद्योगिकदृष्ट्या पुढे जाणारा जिल्हा ठरेल.‘एक खिडकी योजना’ ही फक्त सुरुवात आहे. भविष्यात अजूनही अनेक पायाभूत सुधारणा करण्यात येणार आहेत.” असे श्री.पुजार यावेळी म्हणाले.
परिषदेच्या काही खास गुंतवणूक प्रस्तावांवर प्राथमिक चर्चा झाली असून,जिल्ह्यातील दहा नवीन औद्योगिक प्रकल्पांसोबत सामंजस्य करार करण्यात आला.त्यामध्ये गुंतवणुकी सोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे.
संपूर्ण परिषदेचे आयोजन जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे केले होते.परिषदेमुळे उद्योगधंद्यांच्या दृष्टीने धाराशिव जिल्हा हा आणखी सक्षम आणि आकर्षक केंद्र ठरेल,असा विश्वास व्यक्त केला.परिषदेमध्ये जिल्ह्यातील उद्योगपती, व्यावसायिक,शासनाचे विविध विभाग, बँक प्रतिनिधी आणि उद्योजक सहभागी झाले होते.