
धाराशिव – जागतिक महिला दिन हा दिवस महिलांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. ग्रामीण बीट धाराशिव मार्फत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व सांस्कृतिक महोत्सव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिलवडी येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मा.डॉ. दयानंद जटनुरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा.अशोक पाटील, गटशिक्षणाधिकारी मा.असरार सय्यद, पोलीस उपनिरीक्षक मा.अनघा गोडगे, चिलवडी गावच्या सरपंच मा.रोहिणीताई जाधव, उपसरपंच मा.सुप्रिया जगताप,स्वातंत्र सैनिक मा. बुबासाहेब जाधव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.सौदागर वाघ, उपाध्यक्ष मा.शिलचंद्र भालशंकर, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला ते ग्रामीण बीट धाराशिवचे शिक्षण विस्तार अधिकारी बापू शिंदे यांनी केले. व्यासपीठावरील मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामीण बीट धाराशिव मधील २५ गावातील २५ कर्तृत्ववान महिलांचा व २५ उपक्रमशील महिला शिक्षकांचा सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राघुचीवाडी शाळेतील मुख्याध्यापक महादेव थोरात यांचा सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या संस्कृतीत महोत्सवामध्ये साक्षरता गीत, गवळण, देशभक्तीपर गीते, लावणी, विविध नृत्य सादर करण्यात आली. पांडुरंग विद्यालय जुनोनी यांनी बालविवाहाबद्दल जनजागृती करणारी नाटिका सादर केली. हा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील पालकांनी तुडुंब गर्दी केली होती.
सांस्कृतिक महोत्सवात सहभागी शाळांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. इयत्ता पहिली ते पाचवी, इयत्ता सहावी ते आठवी व इयत्ता नववी ते बारावी अशा तीन गटात नृत्य अविष्काराची स्पर्धा घेण्यात आली होती. गटनिहाय प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक बहिस्थ परीक्षकाच्या मदतीने काढण्यात आले. या शाळांना रोख पारितोषिक, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.