
वाशिम – कायद्याचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीस असणे गरजेचे आहे. न्याय मिळवण्यासाठी केवळ न्यायालयीन लढा देणे हे एकमेव माध्यम नसून, तडजोडीच्या माध्यमातून वाद मिटवणे ही देखील प्रभावी प्रक्रिया आहे. विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकत, मोफत कायदेशीर मदतीचा लाभ गरजू नागरिकांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे दिल्लीचे न्यायमूर्ती न्या.भूषण गवई यांनी केले.
गरजू नागरिकांना मोफत कायदेशीर सेवा आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी आयोजित विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या विशेष उपक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असे प्रतिपादन न्या.भूषण गवई यांनी केले. दि.२२ फेब्रुवारी रोजी स्थानिक वाटाणे लॉन येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी न्या. गवई बोलत होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश शिरीषकुमार हांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विजयकुमार टेकवाणी, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. अनूप बाकलीवाल, जिल्हा न्यायाधीश प्रधान यांच्यासह प्रमुख मार्गदर्शक म्हणून न्या. आर.व्ही. घुगे, न्या. गोविंद सानप, न्या. नितीन सांबारे, न्या. मकरंद कर्णीक, न्या. भारती ढंगारे, न्या. अविनाश घरोटे, न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. अनिल किलोर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या महामेळाव्यात विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला, तडजोडीच्या माध्यमातून वाद निराकरण, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आर्थिक दृष्ट्या दुर्बल, महिला, दिव्यांग, वृद्ध, अल्पसंख्याक आणि शेतकरी वर्गासाठी हा उपक्रम अत्यंत लाभदायी ठरला.
विविध शासकीय विभागांचे मार्गदर्शन व सुविधा उपलब्धी :
या महामेळाव्यात मत्स्य व्यवसाय विभाग, जिल्हा महिला व बालविकास विभाग, सायबर पोलीस, महसूल विभाग, रेशीम विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, समाज कल्याण विभाग, खादी ग्रामोद्योग विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, कौशल्य विकास विभाग, महावितरण यांसह विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते.
न्या. गोविंद सानप यांनी मनोगत व्यक्त करताना कायदेविषयक जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, कायद्याचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीस असणे गरजेचे आहे. न्याय मिळवण्यासाठी केवळ न्यायालयीन लढा देणे हे एकमेव माध्यम नसून, तडजोडीच्या माध्यमातून वाद मिटवणे ही देखील प्रभावी प्रक्रिया आहे.
त्यांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकत, मोफत कायदेशीर मदतीचा लाभ गरजू नागरिकांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन केले. तसेच, लोक अदालत, तडजोड प्रक्रियेचे फायदे, सायबर सुरक्षेविषयी जागरूकता आणि महिलांच्या हक्कांसंदर्भातील कायद्यांची माहिती देत उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.
न्या. श्री. प्रधान यांनी आपल्या मनोगतातून कायदेविषयक साक्षरतेचे महत्त्व स्पष्ट केले आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत न्यायसेवा पोहोचवण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
ते म्हणाले, न्याय हा फक्त न्यायालयातच मिळतो असे नाही, तर तो समाजातही मिळू शकतो. लोक अदालत आणि तडजोडीच्या माध्यमातून लवकर आणि कमी खर्चात न्याय मिळवता येतो. नागरिकांनी कायद्याच्या मूलभूत बाबी समजून घेतल्या, तर अनेक प्रश्न सहज सोडवले जाऊ शकतात. त्यांनी महिला, वृद्ध, दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या मोफत कायदेशीर सेवांचे महत्त्व अधोरेखित केले आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्याची स्तुती केली. कायदा प्रत्येक नागरिकासाठी आहे, त्यामुळे त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. अशा महामेळाव्यांच्या माध्यमातून न्याय व्यवस्था लोकाभिमुख होत आहे, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले.
न्या. आर. व्ही. घुगे यांनी आपल्या मनोगतातून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि न्यायदान प्रक्रिया सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, कायद्याचे संरक्षण हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. मात्र, अनेकांना त्यांच्या हक्कांची जाणीव नसते. अशा महामेळाव्यांच्या माध्यमातून कायदेविषयक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. गरजू आणि दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर मदत मिळाली पाहिजे, हेच विधी सेवा प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यांनी लोक अदालत, तडजोडीच्या माध्यमातून वाद सोडवण्याचे फायदे आणि कायद्याच्या सोप्या प्रक्रियांवर प्रकाश टाकला. विशेषतः महिलांचे हक्क, कामगारांचे अधिकार, वृद्धांसाठीच्या योजनांचा लाभ आणि सायबर सुरक्षेविषयी जागरूकतेचे महत्त्व विषद केले.
न्या. नितीन सांबारे यांनी मनोगत व्यक्त करताना कायदेविषयक साक्षरतेचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, न्यायसंस्थेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देणे. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेबाबत अनेक नागरिक अनभिज्ञ असतात. त्यामुळे कायद्याची मूलभूत माहिती प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. त्यांनी लोक अदालत, मोफत विधी सेवा, तडजोडीच्या माध्यमातून न्याय मिळवण्याचे फायदे आणि विविध सरकारी योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली. विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू व्यक्तींनी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मोफत कायदेशीर मदतीचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
या महामेळाव्यात प्रातिनिधिक स्वरूपात दिव्यांगांना दुचाकी वाटप, दिव्यांग प्रमाणपत्र वितरण, शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर वितरण करण्यात आले.
विधी स्वयंसेवकांचे पथनाट्य ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू :
महामेळाव्यात विधी स्वयंसेवकांनी विविध पथनाट्य सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधले. कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सादर केलेल्या या पथनाट्यांमध्ये महिला हक्क, सायबर गुन्हे, कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह, लोक अदालत व मोफत कायदेशीर सेवा यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश होता. उपस्थित नागरिकांनी या पथनाट्यांना भरभरून प्रतिसाद दिला आणि या अभिनव उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
संचालन ॲड. प्रतिभा वैरागडे यांनी तर आभार ॲड. अनुप बाकलीवाल यांनी मानले. या महामेळाव्यात जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य, वकिल मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, विधी स्वयंसेवक, नागरिकांसह योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान मान्यवरांनी स्टॉलला भेट दिली. महामेळाव्याची सांगता राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने झाली.