
धाराशिव – धाराशिव शहरातील मुख्य रस्ता म्हणून ओळख असलेल्या तुळजापूर या रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून अनेकांनी घरोबा केला होता. ते अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मोहिमा राबविल्या. मात्र अतिक्रमण हटविण्यास यश आलेले नव्हते. त्यातच पावसाचे पाणी दुतर्फा जाण्यासाठी अतिक्रमण असल्यामुळे अनेकांच्या घरात घुसत होते. तसेच रस्त्यात देखील साचून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होत होते. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी नगर परिषद व जिल्हा प्रशासनाकडे ती अतिक्रमणे काढण्यासाठी आंदोलने देखील केली होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नानंतर हे अतिक्रमण हटविण्यासाठी आराखडा टाकून त्यानुसार कृती केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश मोरे यांनी यासाठी पुढाकार घेत ती अतिक्रमणे हटविण्यासाठी हातोडा मोहीम प्रभावीपणे राबवली. त्यांची भूमिका सिंघम स्टाईल असल्यामुळे भल्याभल्यांनी अनेकांना मध्यस्थी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येकाला तोंड देत व हातामध्ये जागेच्या कागदांच्या फायलींसोबत ठेवीत तुमची जागा कुठे आहे कुठपर्यंत आहे त्याचे पी आर कार्ड व कर भरत असल्याची पावती दाखवा असा पवित्रा घेत त्या अतिक्रमणावर जेसीबीच्या बकेटचा जोराचा दणका देऊन ती अतिक्रमणे दि.३० जानेवारी रोजी अक्षरशः जमीनदोस्त केली.
शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ते एमआयडीसी परिसरातील तेरणा महाविद्यालय या शहरातील प्रमुख व मुख्य असलेल्या रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा अगदी घराला घरी चिकटून असतात त्याप्रमाणेच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करुन अनेकांनी आपली दुकाने व घरे थाटली होती. तसेच त्या दुकानास व घराला जाण्यासाठी रस्त्यापासून थेट उंबरठ्यापर्यंत सिमेंट काँक्रेटचा सळयायुक्त स्लॅब टाकून त्यावर पेवर ब्लॉक बसविले होते. तर त्या दुकान किंवा घरासमोर रस्त्याच्या बाजूनेच आपली चार चाकी व दुचाकी वाहने बिनधास्तपणे पार्किंग केली जात होती. त्यामुळे रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकांना तर सोडाच पादचाऱ्यांना देखील व्यवस्थित चालता येत नव्हते. त्यामुळे या रस्त्यावर सतत छोटे-मोठे अपघात होत होते. हे अतिक्रमण धारक इतकी अरेरावी करीत होते की ही माझी जागा असून या जागेवरून कोणीही जायचे नाही अशी तंबी देत होते. तर काहीजणांनी या रस्त्याच्या बाजूलाच अतिक्रमण करुन टोलेजंग इमारती देखील उभारलेल्या आहेत. तर काहीजणांनी पत्र्याचे कॉम्प्लेक्स केले असून ती भाड्याने दिलेली आहेत. या भाड्यापोटी ते महिनाकाठी लाखो रुपयांचा मलिदा देखील गोळा करीत होते.
या अतिक्रमण हटाओ व अतिक्रमणावर जेसीबीच्या साह्याने बकेटरुपी हातोडा टाकण्याच्या मोहिमेमध्ये मोरया मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, के के हॉस्पिटल यासह सिमेंट विक्री दुकाने, कृषी साहित्य विक्री दुकाने, किराणा साहित्य विक्री दुकाने, विविध प्रकारची हॉटेल्स, वाहन दुरुस्ती गॅरेज, पान टपऱ्या, हार्डवेअर, टेलरिंग दुकाने, मेडिकल्स दुकाने व काही घरांचा हा जेसीबी बकेटचा हातोडा टाकण्याची मोहीम यशस्वी व दमदार कामगिरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस के चव्हाण, उपकार्यकारी अभियंता प्रकाश मोरे, शाखा अभियंता डोलारे, शर्मिला सरडे, प्रीती सरडे, रोहिले, अभियंता लष्करे, रोहन कांबळे, ओंकार जोशी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक घुटे, मोहिते, कोळगे, जानराव, शिंदे आदींसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
मुख्य रस्त्याच्या दुतर्फा सेंटर म्हणजेच रस्त्याच्या मध्यापासून दोन्हीकडे ५० फूट अंतरावर ज्यांनी ज्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत. त्या सर्वांचीच अतिक्रमणे जमीनदोस्त केलेली आहेत. यामध्ये गरीब किंवा श्रीमंत असा कोणत्याही प्रकारचा कारवाई दरम्यान भेदभाव केलेला नाही. विशेष म्हणजे अनेकांनी कारवाई करण्यास विरोध देखील केला. मात्र त्यांना तुम्ही कशाच्या आधारे व का विरोध करीत आहेत ? असा प्रती प्रश्न करीत त्यांची बोलती बंद केली.
रस्त्याच्या दुतर्फा होणार सुसज्ज नालीचे बांधकाम
या रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण मोहीम फक्त झाल्याबरोबर लागलीच नालीच्या बांधकामाचे काम हाती घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात जर पुन्हा कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कोणतीही पूर्वकल्पना न देता जे साहित्य टाकलेले असेल ते तर जप्त केले जाईल. शिवाय त्यासाठी दंडात्मक कारवाईचा हातोडा देखील उगारला जाणार आहे.