पारदर्शक व प्रामाणिकपणे काम करून मत्स्योत्पादनात वाढ करा,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

Spread the love

मत्स्यव्यवसाय विभागाचा घेतला आढावा

धाराशिव – मत्स्यव्यवसायाला आता कृषीचा दर्जा मिळाला आहे.त्यामुळे आता मासेमार बांधवांचे जीवनमान उंचावले पाहिजे, मराठवाड्यात मत्स्योत्पादन वाढीला वाव आहे.त्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने मत्स्योत्पादन वाढीसाठी नियोजनातून पारदर्शक आणि प्रामाणिकपणे काम करावे,असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लातूर मत्स्यव्यवसाय विभागाचा आढावा घेताना श्री.राणे बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक रितू खोकर, लातूर मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त श्री.शिरीष गाताडे व छत्रपती संभाजीनगरचे प्रादेशिक उपायुक्त श्री.विजय शिखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री.राणे म्हणाले की, मत्स्योत्पादनासाठी तलाव ठेक्याने देतांना पारदर्शकता असली पाहिजे. अनेक मासेमारी तलावात गाळ साचलेला आहे.तो गाळ काढण्याचा निर्णय पावसाळा संपल्यानंतर घेण्यात येईल.मासेमारी बांधवांचे किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी बँक अधिकाऱ्यांना भेटून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जिल्हास्तरीय बँकांच्या बैठकीत बँकांना किसन क्रेडिट कार्ड काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करावे.ज्या प्रमाणिकपणे काम करणाऱ्या मासेमारी सहकारी संस्था आहेत, त्यांना मदत करण्यात यावी. मत्स्यव्यवसाय विभाग हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, यासाठी जास्तीत जास्त मत्स्योत्पादन वाढले पाहिजे,असे श्री.राणे यांनी सांगितले.

मासेमारी तलावांवर असलेल्या अतिक्रमण काढण्यात यावे,यासाठी पोलीस विभागाची मदत घेण्यात येईल.विविध प्रयोगातून मत्स्य उत्पादन वाढ कशी होईल,यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे.जिल्हा नियोजन समितीतून मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर मत्स्य उत्पादन वाढीसाठी करावा.मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे त्याचा प्रचार -प्रसार मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यापक प्रमाणात करावा,असे त्यांनी सांगितले.

वशिलेबाजीने तलावांचे ठेके देऊ नका,असे सांगून श्री.राणे म्हणाले, त्यांना स्पर्धेत उतरायला लावून योग्य संस्थांची निवड मासेमारी तलावासाठी झाले पाहिजे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात मत्स्य उत्पादन होण्यास मदत होईल.मत्स्यबीज संवर्धन केंद्रातून मोठ्या प्रमाणात मत्स्यबीजांचे उत्पादन घ्यावे. मत्स्यबीजांचे उत्पादन वाढले तरच मत्स्य उत्पादनात वाढ होईल. चिलापिया माशांचे उत्पादन बंद झाले पाहिजे,याची दक्षता मत्स्यव्यवसाय विभागाने घ्यावी.चिलापिया या माशामुळे अन्य देशी माशांचे नुकसान होत आहे.चिलापिया माशांवर बंदी आणण्यासाठी वरिष्ठांशी पत्रव्यवहार करण्यात येईल,मत्स्यव्यवसाय विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या पदाला न्याय देऊन काम करावे.असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन वाढीला चालना देण्यात येईल,असे सांगून जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले, जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या सभासद असलेल्या मासेमार बांधवांचे किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी जिल्हास्तरीय बँकांच्या बैठकीत बँकांच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येईल. जिल्हा नियोजन समितीतून मत्स्य व्यवसाय विभागाला देण्यात येणाऱ्या निधीचा वापर मत्स्योत्पादन वाढीसाठी करण्यावर आपला भर राहणार असल्याचे श्री.पुजार यांनी सांगितले.

लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त श्री.गाताडे यांनी सादरीकरणातून लातूर मत्स्यव्यवसाय विभागाची माहिती दिली.विभागात १ हजार हेक्टरवरील ४ तलाव,५०० ते १ हजार हेक्टरचे ३ तलाव,५०० हेक्टरवरील ५०९ तलाव असे एकूण ५१६ तलाव असून या पाटबंधारे तलावांचे जलक्षेत्र ३८ हजार हेक्टर आहे.मार्च-२०२५ अखेर या तलावातून २५ हजार ३९३ मे.टन मत्स्योत्पादन घेण्यात आले. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून २ हजार ७७५ मे.टन माशांचे उत्पादन घेण्यात आले.लातूर विभागात ५०१ मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था असून या संस्थांचे १८ हजार ३ सभासद आहेत. शासकीय मत्स्यबीज केंद्रातून मार्च २०२५ पर्यंत १ हजार २२६ .५० लक्ष मत्स्यबीजांचे उत्पादन घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.लातूर विभागातंर्गत येणाऱ्या लातूर, धाराशिव,नांदेड व हिंगोली जिल्ह्यात सन २०२२-२३ ते सन २०२४ -२५ या वर्षात तलावातून २८ हजार १६८ मे.टन मत्स्योत्पादन घेण्यात आले. ४९३ तलाव ठेकेदारी पध्दतीने दिले असून या तलावातून प्रत्यक्षात ४५ कोटी ५५ लक्ष २४६ रुपये इतका महसुल प्राप्त झाल्याची माहिती श्री.गाताडे यांनी दिली.

या आढावा बैठकीला मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती तेजास्विनी करळे (लातूर), जे.एस.पटेल (धाराशिव),विक्रम कच्छवे (नांदेड),भास्कर सानप (बीड),अजित सुरवसे (परभणी), डॉ.मधुरिमा जाधव (छत्रपती संभाजीनगर),धाराशिव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एन.मदने,मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रभाकर महामुनी,लघु पाटबंधारे विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता शैलेश विश्वेकर,मत्स्य व्यवसाय अधिकारी ए.एस.मुसळे (लातूर),ए.डी.देवकते (धाराशिव) आदीची उपस्थिती होती.

  • Related Posts

    एसटीचे खासगीकरण होणार नाही – परिवहन मंत्री सरनाईक यांची ग्वाही

    Spread the love

    Spread the loveराज्य शासनाचा अंगीकृत सार्वजनिक उपक्रम असलेली एसटी महामंडळ ही सुमारे ८३ हजार कर्मचाऱ्यांची ‘मातृसंस्था’ असून तिचे खासगीकरण होणार नाही, अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप…

    लोहटा पूर्व गावास महसुली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा! महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक , आमदार कैलास पाटील यांची माहिती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ता. 14: कळंब तालुक्यातील लोहटा (पूर्व) गावाला महसुली ओळख मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला होता अखेर या गावास आता महसूली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आमदार कैलास…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *