
धाराशिव – कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणात टाळाटाळ करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीला कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे राज्य अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, तसेच जिल्ह्यातील सर्व प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
धाराशिव जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवकांनी महामंडळाच्या कर्ज प्रकरणात बँकांकडून होणाऱ्या टाळाटाळीविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. हजारो कर्ज अर्ज बँकांकडून मंजूर न करता प्रलंबित ठेवले गेले असून, या प्रकारामुळे युवकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बँका महामंडळाच्या कर्ज फाईल्स मंजूर करत नसल्यामुळे शासनाने अशा बँकांवर कठोर कारवाई करावी, अशी समितीची ठाम मागणी आहे.
या निवेदनप्रसंगी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव चे उपाध्यक्ष अमोल सिरसट, तालुकाध्यक्ष मनोज मोरे, उपाध्यक्ष बबलू भोईटे, शहराध्यक्ष हनुमंत यादव, उपाध्यक्ष आकाश भोसले, रिक्षा समिती कार्याध्यक्ष योगेश अतकरे, धर्मराज सूर्यवंशी, अच्युत थोरात (मेजर), आशिष क्षीरसागर, ज्योतीराम काळे, भैरवनाथ रणखांब, अविनाश रणखांब, हनुमंत तांबे सर, गणेश पवार, लहू शिंदे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.