
धाराशिव – धाराशिव शहरातील वर्ग २ जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासंदर्भात आज एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये शहरातील जमीनधारकांच्या मागण्या, अडचणी आणि शासकीय प्रक्रियेतील अडथळ्यांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीदरम्यान उपजिल्हाधिकारी श्री. शिरीष यादव यांनी स्पष्ट केले की, ज्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर थेट भूसंपादनाची नोंद आहे, त्या प्रकरणांमध्ये स्वतंत्र भूसंपादन अहवालाची आवश्यकता नाही. ही बाब शेतकरी व जमीनधारकांसाठी मोठा दिलासा ठरणारी आहे.
आमदार कैलास पाटील यांनी या मुद्द्यावर अधिक स्पष्टता देत, अशा भूसंपादीत जमिनींच्या नोंदी त्वरित करण्यात याव्यात, असे प्रशासनाला निर्देश दिले. यासोबतच, संबंधित जमीनधारकांना त्यांच्या जमिनीचे भूसंपादन झाले असल्याची माहिती पत्राद्वारे देण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जर भूसंपादन प्रक्रियेत काही त्रुटी किंवा गैरसमज असेल, तर त्या मंत्रालयीन स्तरावर पत्रव्यवहार करून मार्गी लावण्याच्या दिशेने पावले उचलण्याचेही निर्देश आ. पाटील यांनी दिले.
या बैठकीस उपजिल्हाधिकारी श्री. शिरीष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, तालुका भूमी अभिलेख अधिकारी, संबंधित शासकीय अधिकारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जमिनींच्या वर्ग १ मध्ये रूपांतर प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता असून, धाराशिवमधील अनेक जमीनधारकांना त्याचा थेट लाभ होणार आहे.