
बार्शी – स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी तसेच धनंजय मुंढे यांनाही या प्रकरणात सहआरोपी करावे, अशी मागणी करत आज बार्शी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापारी, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला.
यावेळी निषेधार्थ बार्शी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी “संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे!” अशा जोरदार घोषणा दिल्या. आंदोलकांनी वाल्मीक कराड आणि इतर आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली.
बार्शी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकांचा रोष पाहता प्रशासन सतर्क होते. अद्याप अधिकृत प्रतिसाद आलेला नसला तरी पुढील काळात या मागण्यांबाबत शासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.