
धाराशिव – राज्य महिला आयोगाच्या कार्यालयातील १५५२०९ या हेल्पलाइन वर शुक्रवारी सकाळी दि २३ मे ला एका तरुणाचा फोन आला. आयोगाच्या समुपदेशक श्रीमती सुनीता गणगे यांनी त्याच्याशी संवाद साधला. आपले नाव न सांगण्याच्या अटीवर या मुलाने धाराशिव जिल्ह्यातील नांदुर्गा तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा, दुसऱ्या दिवशीच बालविवाह होणार असल्याचे सांगितले. जागरूक नागरिक असलेला हा मुलगा कुटुंबाला, गावाला आपले नाव कळले तर या भीतीच्या छायेत होता. मात्र समुपदेशक श्रीमती गणगे यांनी त्याला त्याची गोपनीयता राखण्याचा विश्वास देत अधिक माहिती मागितली. मग मिळालेल्या माहितीनुसार तातडीने स्थानिक पोलिस स्टेशनचा शोध घेतला. बेंबळी पोलिस स्टेशन मध्ये संपर्क करत त्यांना फोनवर मिळालेली माहिती दिली. धाराशिव जिल्ह्यातील बाल कल्याण समितीला पत्र लिहून बालविवाह थांबविण्यासाठी सूचित केले. शनिवारी, २४ मे ला या अल्पवयीन मुलीचे लग्न भूम तालुक्यातील तरुणाशी होणार होते. आयोगाच्या सतर्कतेने आणि बाल कल्याण समिती, पोलिस यांनी लगेचच घेतलेल्या भूमिकेने बाल विवाह थांबवण्यात आला. शनिवारी नांदुर्गा तालुक्यातील मुलीच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांची संवाद साधून महिला बालविकास अधिकारी, चाईल्ड लाईनचे अधिकारी आणि पोलीस यांनी बालविवाह न करण्याबाबत त्यांचे समुपदेशन केले. मुलगी सज्ञान होई पर्यंत बालविवाह करणार नाही असे हमी पत्र लिहून घेतले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने बालविवाह करणार होते असे कळल्यानंतर अधिकाऱ्यांनी मुलीची शासकीय बालगृहात व्यवस्था करून शिक्षण पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले.
जागरूक नागरिकाचा एक फोन, राज्य महिला आयोगाची सतर्कता आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने 24 तासात एक बालविवाह रोखण्यात आला. एका वाढत्या वयातील मुलीला अकाली संसार, मातृत्व यापासून संरक्षण देण्यात आले.